केजजवळ शिवशाही बस पलटी; सहा प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

जेसीबीच्या सहाय्याने जखमींना काढले
पलटी झालेल्या बसखाली शिक्षिका रेणुका माळी आणि  अमर सिद्दिकी हे दोघेजण अडकले होते. याने त्यांना बाहेर काढता येत नव्हते. होळ ग्रामस्थांच्या मदतीने व जेसीबी मशीनच्या सहाय्याने तबसखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढले.

केज/अंबाजोगाई : लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस अंबाजोगाई - केज रस्त्यावरील होळ (ता. केज) जवळ पलटी होऊन झालेल्या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले. मंगळवारी (ता. एक) सकाळी झालेल्या अपघातातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या रस्त्यावर शिवशाही बसचा हा दुसरा अपघात आहे. 

मंगळवारी पहाटे लातूर येथून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस (एमएच ०९ ईएम २४६८) सकाळी साडेसहा वाजता होळच्या पुढे आल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना अरुंद रस्त्याच्या खाली उतरली व पलटी झाली.  या अपघातात बसचालक भागवत दादाराव केंद्रे (वय २६, रा. उंडेगाव), रेणुका कल्याण माळी (वय ३०, माळी चिंचोली) आणि अमर जियाउद्दीन सिद्दिकी (वय नऊ, लातूर) हे तिघे गंभीर जखमी झाले तर पांडुरंग भीमराव म्हेत्रे (वय ५६, केज), राजू सानुजी इवले (वय २६, औरंगाबाद) आणि सतिश गणपत गव्हाणे (वय ३०, बोरगाव) हे जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बसमध्ये प्रवाशांची संख्या आणि बसचा वेग कमी असल्याने मोठी हानी टळली. 

जेसीबीच्या सहाय्याने जखमींना काढले
पलटी झालेल्या बसखाली शिक्षिका रेणुका माळी आणि  अमर सिद्दिकी हे दोघेजण अडकले होते. याने त्यांना बाहेर काढता येत नव्हते. होळ ग्रामस्थांच्या मदतीने व जेसीबी मशीनच्या सहाय्याने तबसखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढले.

उखडून ठेवलेला रस्ता आणि संथ काम
दरम्यान, अहमदनगर - अहमदपूर रस्त्याचे काम सुरू आहे. यातील लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) ते मांजरसुंबा (ता. बीड) हा रस्ता जागोजाग उखडून ठेवला आहे. संथ गतीने काम आणि पर्यायी रस्ता नसल्याने वाहनचालक त्रस्त तर आहेतच शिवाय असे अपघातही घडत आहेत. रस्ता काम करताना एक बाजु उखडून दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवणे अवश्यक आहे. मात्र, इथे दोन्ही बाजू खोदून ठेल्या आहेत. 

Web Title: st bus accident near kej 6 injured