आता बसचे "लोकेशन' समजणार

ST
ST

एसटीचा प्रवास ऍपवर दिसणार, लवकरच जीपीएस यंत्रणा
औरंगाबाद - एसटी महामंडळाची बस केव्हा येईल, सध्या ती कुठे आहे, हा सर्व प्रवास एका क्‍लिकवर समजणार आहे. त्यासाठीची यंत्रणा महामंडळाने सज्ज केली आहे. येत्या सहा महिन्यांत एसटी बस ऍपवर ट्रॅक करता येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

एसटी महामंडळाने कात टाकण्यास सुरवात केली आहे. पारंपरिक लालपरी हद्दपार करून एमएस स्टीलच्या आकर्षक रंगसंगतीच्या बस बांधणीला सुरवात केल्यानंतर आता एसटीचा प्रवास ऑनलाइन करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. जवळपास पंधरा हजार बस महामंडळाकडे आहेत. या सर्व बस रात्रंदिवस रस्त्यावर धावत असतात; मात्र एसटी बस कुठे आहे, ती केव्हा येईल, याचा काहीही अंदाज लावता येत नव्हता. लांब पल्ल्याची बस वेळवर आहे किंवा उशिराने धावत आहे, याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे बसस्थानकात बसची तास तास वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता; मात्र आता मोबाईल ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना बसचा प्रवास कळणार आहे. येत्या मार्चपर्यंत हे सर्व काम पूर्ण होईल, असा आशावाद देओल यांनी व्यक्त केला. एसटी बस ऑनलाइन करण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्यानंतर सर्वप्रथम नाशिक आगारात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. नाशिक आगाराच्या सर्व बसगाड्यांना जीपीएस बसवून ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. सध्या त्यातील त्रुटींवर काम सुरू आहे. हे काम मार्चपर्यंत पूर्ण होऊन संपूर्ण राज्यभर एसटीची सेवा ऑनलाइन होणार असल्याचे देओल यांनी सांगितले.

बसस्थानकात मिळेल माहिती
एसटी ऑनलाइन केल्यानंतर प्रत्येक बसस्थानकात डिजिटल बोर्ड बसविण्यात येतील. बसस्थानकात बसबद्दल माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे नागरिकांनाही मोबाईल ऍपच्या माध्यमातून बसची सर्व स्थिती समजण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com