छावणी बाजाराच्या गोठ्यात २३ गायी-बैलांचा तडफडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - छावणीतील जनावरांच्या आठवडे बाजारासाठी आणलेल्या २३ गायी-बैलांचा कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाने तडफडून मृत्यू झाला. ३१ गाय-बैलांवर मरणासन्न अवस्थेत उपचार सुरू करण्यात आले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, या प्रकाराने छावणी परिषद प्रशासन, कंत्राटदाराच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे. 

औरंगाबाद - छावणीतील जनावरांच्या आठवडे बाजारासाठी आणलेल्या २३ गायी-बैलांचा कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाने तडफडून मृत्यू झाला. ३१ गाय-बैलांवर मरणासन्न अवस्थेत उपचार सुरू करण्यात आले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, या प्रकाराने छावणी परिषद प्रशासन, कंत्राटदाराच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे. 

निजामकालीन जनावरांचा बाजार म्हणून छावणी बाजाराची ख्याती आहे. यासाठी राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश, अन्य राज्यांतून गायी, म्हशी, अन्य जनावरे विक्रीसाठी आणली जातात. बाजारात विक्री न झालेल्या जनावरांना सांभाळण्यासाठी छावणी परिषदेने गोठा तयार केलेला आहे. या गोठ्यात एकावेळी पाचशे ते सहाशे जनावरे ठेवता येतील अशी व्यवस्था आहे. छावणी परिषदेने जनावरांची देखभाल करण्याचा ठेका अजिम देशमुख यांना दिलेला आहे. या गोठ्यात सुपरवायझर म्हणून असद आणि इम्रान पटेल हे देखभालीचे काम करतात.  

गायी-बैलांचा तडफडून मृत्यू  
सध्या या ठिकाणी जवळपास गाय, बैल, म्हशी मिळून चारशेच्या जवळपास जनावरे आहेत. बुधवारी सकाळी गाय-बैलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रीन स्वस्तिक या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, मिर्झा आझम बेग, मयंक पाडे यांनी घटनास्थळी धाव घेत खात्री केली. त्यानंतर पोलिस आयुक्तांना फोन करून माहिती दिली. बुधवारी सकाळपर्यंत जवळपास चाळीस गाय-बैल मृत्युमुखी पडलेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, सायंकाळपर्यंत पोलिसांनी सतरा गायी, सहा बैल मृत्यू पडल्याची पोलिस ठाण्यात नोंद केली. घटनास्थळी ३१ जनावरे तडफडत होती. 

छावणी परिषदेचे दुर्लक्ष
जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाल्यावर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर, ब्रिगेडियर अनुराग वीज, ॲडमिन कमांडर गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर ट्रॅक्‍टर, जेसीबीच्या मदतीने मृत्युमुखी पडलेल्या गाय-बैलांना तीसगाव शिवारात पुरण्यात आले. घटनेच्या अनुषंगाने सुरवातीला सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. जी. एन. पांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. पी. कुलकर्णी, पशुधन विकास अधिकारी ए. एन. गडवे यांनी अत्यवस्थ जनावरांवर उपचार केले. दुपारनंतर जिल्ह्यातील पंधरा डॉक्‍टरांच्या मदतीने उपचार करण्यात येत होते. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. जनावरे उपचाराला साथ देत असून, काही जनावरांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समजू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पोलिस आयुक्तांनी घेतली दखल

घटनास्थळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक चंद्रकांत साळवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सुरेश वानखेडे आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिस आयुक्तांपाठोपाठ महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप, महापालिका पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. 

परिसरात घाण, दुर्गंधी
गोठ्याच्या परिसरात प्रचंड घाण व दुर्गंधी पसरलेली असून, जनावरे मृत्युमुखी पडल्यानंतर पोलिस जमा होत असल्याचे दिसताच कंत्राटदाराने जनावरांना थोड्याफार प्रमाणात चारा टाकला. तोपर्यंत जनावरे उपाशी होती, असे पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकाराबद्दल पोलिस आयुक्तांनी कंत्राटदाराला जाब विचारला. पोलिस आयुक्तांनी जाब विचारल्यावर कंत्राटदाराने सारवासारव करून ही जनावरे रात्रीच एका व्यापाऱ्याने आणलेली असून, ट्रकमध्ये साठ ते सत्तर जनावरे कोंबून आणल्याने त्यांच्यावर परिणाम झाला असावा, असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस निरीक्षक सावळे यांनी तातडीने हा मुद्दा खोडत जनावरे कालपासून मृत्यू झालेली असल्याचे स्पष्ट केल्यावर पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार कंत्राटदार अजिम देशमुख, सुपरवायझरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

छावणीच्या या गोठ्यामध्ये व्यापारी गायी व बैल आणून ठेवतात. व्यापारी जनावरे आणतात. काही काळ ठेवण्याचे हे ठिकाण असून, त्यांची याच परिसरातील कत्तलखान्यात कत्तल केली जाते. हा गंभीर प्रकार असून, यापूर्वी तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. छावणी परिषदेचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जाते. पोलिस आयुक्तांनी हे रॅकेट शोधून कारवाई करावी.
- वीरेंद्र गायकवाड, अध्यक्ष, ग्रीन स्वस्तिक संस्था. 

छावणीतील गायी-बैलांचा ठेकेदार अजिम देशमुख आणि अजिम पटेल यांच्या निष्काळजीपणामुळे या बैलांचा मृत्यू झाला आहे. अजूनही अनेक गायी-बैल आजारी असून, याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई होणे, गुन्हे दाखल होणे आवश्‍यक आहे.
- मयंक पांडे, छावणी युवा विकास मंच. 

Web Title: Stable market bulls cow & bulls death

टॅग्स