मुद्रांकच्या तुटवड्यात अधिकाऱ्यांची साठेबाजी 

अतुल पाटील/संदीप लांडगे 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुद्रांकाचा तुटवडा होता. मात्र, कालच भरपुर साठा आला आहे. तांत्रिक अडचणीमुळे वितरीत करण्यास विलंब होत आहे. 
- प्रमोद आहेर (अप्पर कोषागर अधिकारी, औरंगाबाद) 

औरंगाबाद : "शंभरचा बॉंड हाय का?' असे मिनिटाला किमान तीनदा प्रश्‍न ऐकू येत आहेत. यामुळे मुद्रांक विक्रेते भंडावून गेले आहेत. कोषागार विभागातील अधिकाऱ्यांच्या साठेबाजीमुळे मुद्रांकचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन "इअर एंडिंग'च्या काळात लोक डोक्‍याला हात लावून बसले आहेत. मुद्रांकसाठी अडलेले लोक तर "शंभरचा बॉंड पाचशेला द्या.' अशी विनवणीही करत आहेत. 

शहरात दीड महिन्यापासून मुद्रांकचा तुटवडा आहे. मुद्रांकसाठी विक्रेते येरझाऱ्या घालत आहेत. कोषागार विभागाकडून मात्र, मागणी पुर्ण होत नाही. औरंगाबादच्या कोषागार विभागातर्फे न्यायिक आणि बिगर न्यायिक मुद्रांकची मागणी आठ डिसेंबरला मुंबईच्या मुद्रांक विभागाकडे केली होती. 27 डिसेंबरला मुद्रांक मिळणार होते. त्यानुसार पहाटे चारला मुद्रांक औरंगाबादेत पोचलेही. मात्र, मुंबईच्या मुद्रांक विभागाकडून पाठवलेल्या मुद्रांकाच्या नंबरची यादी ऑनलाईन मिळाली नाही. 

औरंगाबाद कोषागार विभागात सात कोटीपेक्षा अधिक किंमतीचे मुद्रांक पडून आहेत. मात्र, विक्रेत्यांना ते वाटता येत नाहीत, अशी स्थिती आहे. कोषागार विभागात काही प्रमाणात साठा असतानाही ते वितरीत केले जात नाहीत. शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, बॅंकिंग क्षेत्रात प्रतिज्ञापत्र, शपथपत्र, करारनामा आदींसाठी मुद्रांक लागत आहेत. मुद्रांकाच्या कृत्रिम तुटवड्याने गरजवंत त्रस्त झाले असून न्यायालय परिसरात दोन दिवसांपासून अशा लोकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. 

मुद्रांकाचा तुटवडा होता. मात्र, कालच भरपुर साठा आला आहे. तांत्रिक अडचणीमुळे वितरीत करण्यास विलंब होत आहे. 
- प्रमोद आहेर (अप्पर कोषागर अधिकारी, औरंगाबाद) 

ऑनलाईन चलन भरुनही आम्हाला टप्प्याने मुद्रांक दिले जात आहेत. मुद्रांक संपल्याने नागरिकांची कामे ठप्प झाली आहेत. 
- पृथ्वीराज राठोड (मुद्रांक विक्रेता) 

Web Title: stamp shortage in Aurangabad