ती फुलराणी भेटली, तर अंतू बरवाने विचारली खुशाली 

सुहास सदाव्रते
रविवार, 18 ऑगस्ट 2019

जालना - पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्‍ती अन्‌ वल्ली एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून जालन्यातील रसिकांना भेटल्या... स्पर्धेत काहींना आठवले तर काही एकदम मध्येच विसरले..,काही गडबडले, काहींनी नुसतीच नक्‍कल केली. काहींना फुलराणी भेटली तर अंतू बरवाने खुशाली विचारली अर्थात स्टॅंडअप कॉमेडी स्पर्धेने निराळी अनुभूती दिली हे मात्र नक्‍कीच. 

जालना - पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्‍ती अन्‌ वल्ली एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून जालन्यातील रसिकांना भेटल्या... स्पर्धेत काहींना आठवले तर काही एकदम मध्येच विसरले..,काही गडबडले, काहींनी नुसतीच नक्‍कल केली. काहींना फुलराणी भेटली तर अंतू बरवाने खुशाली विचारली अर्थात स्टॅंडअप कॉमेडी स्पर्धेने निराळी अनुभूती दिली हे मात्र नक्‍कीच. 

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यभर पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले आहे. जालना जिल्हाफेरी शनिवारी (ता. 17) शहरातील जेईएस महाविद्यालयात पार पडली. मराठी मनावर विनोदी लेखनाने अधिराज्य गाजविणारे साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्‍ती अन्‌ वल्लींचे अभिनयरूपी दर्शन रसिकांना झाले.

स्पर्धेत सुमीत शर्मा याने साकारलेल्या चितळे मास्तरने उपस्थितांना चांगलेच हसविले. "तुज आहे तुजपाशी' या नाटकातील एक प्रसंग प्रभूराम गाढे या स्पर्धकाने सादर केला. जामवाडी येथील प्राजक्‍ता कुलकर्णी हिने साकारलेली "ती फुलराणी'ने उपस्थितांना खिळवून ठेवले. तर, नंदू वाघमारे या स्पर्धकाने "असा मी असा मी' यातील एक प्रसंग सादर केला. गणेश लोखंडे याने हरी तात्या ही भूमिका सादर केली. स्पर्धेत काही स्पर्धक अचानक संवाद थांबवित, तर काही विसरत होते. हे घडत असताना उपस्थित प्रेक्षक मात्र हसत, नेमके स्पर्धेत आहे की स्पर्धक खरेच विसरला आहे असा संभ्रम दिसून आला. काहीचे अचानक संवाद विसरणे, तर गडबडून जाणे असे एक ना अनेक किस्से पाहायला मिळाले. 

'ससा'ने सादर केला पोवाडा 
एका स्पर्धकाने आपले नाव ससा आहे, असे सांगितले अन्‌ सभागृहात हास्याचे कारंजे उडाले. माझे नाव सर्वेश साबळे अर्थात ससा आहे, असे सांगितले. या स्पर्धकाने पुलंच्या नावाचा विनोदी पोवाडा सादर करून उपस्थिताना चांगलेच हसविले. "असा मी असा मी' हा प्रसंग सादर करून वाहवा मिळविली. स्पर्धेत सतीश लिंगडे विजेता ठरला, तर संदीप शिंदे उपविजेता ठरला. 

पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेची जबाबदारी आमच्या महाविद्यालयाकडे देण्यात आली. अनेक स्पर्धकांनी सहभाग घेत वेगळा अनुभव घेतला. 
- डॉ. यशवंत सोनुने 
समन्वयक, स्टॅंडअप कॉमेडी स्पर्धा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stand-up comedy competition in Jalna