बैठकांच्या इतिवृत्तांना "स्थायी' देईना मंजुरी ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

औरंगाबाद - स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांच्यासह आठ सदस्यांची मुदत संपण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाही काही बैठकांच्या इतिवृत्तांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. यामुळे स्थायी समिती अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. आता इतिवृत्त मंजुरीची जबाबदारी नवीन सभापतींवर येणार असल्याची चर्चा आहे. 

औरंगाबाद - स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांच्यासह आठ सदस्यांची मुदत संपण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाही काही बैठकांच्या इतिवृत्तांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. यामुळे स्थायी समिती अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. आता इतिवृत्त मंजुरीची जबाबदारी नवीन सभापतींवर येणार असल्याची चर्चा आहे. 

महापालिकेच्या अर्थिक बाबीशी संबंधित स्थायी समिती ही अतिशय महत्त्वाची समिती मानली जाते. या समितीच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय महापालिकेच्या एकूणच कार्यपध्दतीवर प्रभाव टाकणारे असतात. सर्वसाधारण सभा महिन्यात किमान एक वेळा घ्यावी असा नियम आहे, त्यामुळे दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाते. स्थायी समितीच्या चार सदस्यांनी पत्र दिले, तरच विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते. स्थायी समितीच्या बैठकीसाठी असे बंधन नाही. सभापतींनी ठरविले तर दर आठवड्याला स्थायी समितीची बैठक होऊ शकते. त्याला अपवाद फक्त निवडणूक आचारसंहितेचा आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. वर्षभरात 193 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. स्थायी समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याने सहा महिन्यापूर्वी नगरसचिवांना पत्र देऊन इतिवृत्त मंजूर केले जात नाहीत याची जाणीव करून दिली. किती बैठकांचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले याची लेखी माहिती त्यांनी मागितली; पण त्यांना अद्याप माहिती देण्यात आली नाही. स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले यांच्यासह आठ सदस्य शनिवारी (ता. 29) स्थायी समितीमधून निवृत्त होत आहेत. निवृत्त झाल्यानंतर मेघावाले इतिवृत्त मंजूर करू शकणार नाहीत, त्यामुळे आतापर्यंतचे संपूर्ण इतिवृत्त नवीन सभापतींसमोर ठेवून ते मंजूर करून घेण्याची कसरत करावी लागणार आहे. नवीन सभापतींनी जुने इतिवृत्त मंजूर करण्यास नकार दिला, तर विद्यमान स्थायी समिती संकटात येऊ शकते असे जाणकारांचे मत आहे. 

Web Title: standing committee