राज्य महामार्गालगतच्या 611 दारू दुकानांवर गंडांतर 

विकास गाढवे - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

लातूर - राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेली देशी व विदेशी दारू दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दूरगामी परिणाम जिल्ह्यातील दारूविक्रीच्या व्यवसायावर होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 664 पैकी 611 विक्रेत्यांना आपली दारू दुकाने बंद करून दुसरीकडे हलवावी लागणार आहेत. यात जिल्ह्यातील केवळ 53 दुकाने सुरक्षित अंतरावर असल्याचे आढळून आले असून त्यांना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसणार नाही. 

राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या अपघाताला अनेक ठिकाणी दारू कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याने अनेकांचा अपघातात बळी गेला आहे. यामुळेच राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतची दारूविक्रीची दुकाने दूर अंतरावर हलवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यातून न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय मार्गापासून पाचशे मीटर (एक हजार 650 फूट) अंतराच्या आतील सर्व प्रकारच्या दारू दुकानांना बंदी घातली आहे. सध्या या अंतरात असलेली दुकाने येत्या 31 मार्चपर्यंत हलवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार बाधित होणाऱ्या दुकानांचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यातील 611 दुकानांवर गंडांतर येणार आहे. 

जिल्ह्यात सध्या 21 राज्य महामार्ग असून त्याची लांबी एक हजार 139 किलोमीटर आहे. एकही राष्ट्रीय महामार्ग नसला तरी एका राज्य महामार्गाचे रूपांतरच नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गात झाले आहे. या महामार्गाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने जिल्ह्यात 21 राज्य महामार्गालगत असलेल्या दारू दुकानांचे महामार्गापासून अंतर मोजण्यात आले. सध्या 714 देशी, विदेशी व अन्य प्रकारच्या दारूविक्रीची दुकाने असून त्यापैकी 664 सुरू आहेत. यात राज्य महामार्गालगत पाचशे मीटर अंतरात येणारी 611 दुकाने असून न्यायालयाच्या आदेशानुसार ही दुकाने येत्या एक एप्रिलपासून बंद करावी लागणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बंद होणाऱ्या दुकानांत 94 देशी, अकरा वाईन शॉप, 390 परमिट रूम बिअर बार (विदेशी), आठ क्‍लब व 108 बिअर शॉपींचा समावेश आहे. 

""दारूमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण केवळ साडेतीन टक्के आहे. अन्य कारणांमुळे 96.5 टक्के अपघात होतात. याचा विचार न करता न्यायालयाने अपघाताला केवळ दारूलाच कारणीभूत ठरवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरांतून गेलेले राज्य व राष्ट्रीय महामार्ग महापालिका व नगरपालिकेला हस्तांतरित केले आहेत. त्यांना अंतर्गत रस्ता म्हणून दर्जा दिला तरी राज्यातील 70 टक्के दारू दुकानांची न्यायालयाच्या आदेशातून सुटका होईल. न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तयारी ठेवत सरकारकडून सहकार्याची अपेक्षा आहे.'' 
- यशवंत रांजणकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र देशी मद्यविक्रेता महासंघ, लातूर 

Web Title: State Highway 611 liquor shops