आमच्या चांगल्या योजना लालफितीत अडकतात: पर्यटन मंत्री

संकेत कुलकर्णी
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

आमचं सरकार डाऊन टू अर्थ
श्रीलंकेच्या पर्यंटनमंत्र्यांशी ओळख करून देताना ते फार डाऊन टू अर्थ आहेत, अशी टिप्पणी एकाने केली. यावर 'आमचं सरकारही डाऊन टू अर्थ'च आहे, हे सांगायलाही श्री. रावल विसरले नाहीत. रोजगार हमी योजना आणि पर्यटन विभागाच्या वतीने राज्यातलीय 500 किल्ल्यांवर 100 दिवसांची स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांच्या खास प्रयत्नांतून आम्ही आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषद घेतली. अजिंठ्याला जगाच्या नकाशावर आणत आहोत. आमच्या अनेक योजना चांगल्या असतात, पण 'ब्यूरोक्रसीची चायना वॉल' त्या लोकांपर्यंत पोहोचण्यात अडथळा ठरते, अशी कबुलीच पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

औरंगाबादेत आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेच्या उदघाटनाला आलेल्या पर्यटनमंत्र्यांनी रात्री उशिरा माध्यम प्रतिनिधींना भेट दिली. यावेळी या कार्यक्रमापासून माध्यमांना दूर का ठेवले, असे विचारले असता त्यांनी अधिकारी वर्गाकडे बोट दाखवले. "आम्ही अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतो; पण 'ब्यूरोक्रसीची चायना वॉल'अडथळा ठरते. योजना जोरदार असते, पण अंमलबजावणी होईपर्यंत फार उशीर झालेला असतो. शेतकऱ्यांसाठी 25 हजार कोटींची योजना आखली, पण ज्या गतीने काम झाले पाहिजे, तसे होत नाही. स्वतःला सगळे माहीत असल्यासारखे वागतात," अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. पर्यटन वाढीसाठी पटापट निर्णय घेतले पाहिजेत. ते यानिमित्ताने घेतल्याचे श्री. रावल म्हणाले.

आमचं सरकार डाऊन टू अर्थ
श्रीलंकेच्या पर्यंटनमंत्र्यांशी ओळख करून देताना ते फार डाऊन टू अर्थ आहेत, अशी टिप्पणी एकाने केली. यावर 'आमचं सरकारही डाऊन टू अर्थ'च आहे, हे सांगायलाही श्री. रावल विसरले नाहीत. रोजगार हमी योजना आणि पर्यटन विभागाच्या वतीने राज्यातलीय 500 किल्ल्यांवर 100 दिवसांची स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अजिंठ्याचे तिकीट मिळणार अभ्यागत केंद्रात 
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अडेलतट्टू विभाग आहे. ते स्वतःही काही करत नाहीत आणि आम्हालाही करू देत नाहीत. तीन वर्षांपासून आम्ही अजिंठा लेणीचे तिकीट विक्री केंद्र अभ्यागत केंद्रात आणण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण अखेर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून थेट पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केल्यानंतर आता अभ्यागत केंद्रात तिकीटघर आल्याचे ते म्हणाले. पर्यटकाला एकाच ठिकाणी सर्व सोयी मिळाल्या पाहिजेत, तरच ते पुन्हा पुन्हा येतील. तशाच पर्यटन योजना सरकार आखत असल्याचे श्री. रावल यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: state tourism minister Jaykumar Raval statement