डॉक्टरांवर सामाजिक कार्याच्या संस्काराची आवश्यकता : डॉ. कुकडे

Ashok Kukde
Ashok Kukde

लातूर : ‘‘वैद्यकीय सेवा महागडी झाली आहे, हे खरे आहे. पण यातील अनेक गोष्टी अपरिहार्य आहेत. कारण वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूक प्रचंड वाढली आहे. ही गुंतवणूक काही आभाळातून पडत नाही. त्यामुळे वैद्यकीय सेवेतील किंमती काही प्रमाणांत वाढलेल्या असणारच; पण त्याच्या नावाखाली डॉक्टरानी रुग्णाला फसवून पैसे घेऊ नये. रुग्णाशी प्रामाणिकच राहायला हवे", अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अशोक कुकडे यांनी व्यक्त केली. हल्लीच्या डॉक्टरांवर सामाजिक कार्याचे संस्कार होण्याची आवश्यकता आहे, असेही म्हणाले.

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा, शिक्षण पोचविल्याबद्दल डॉ. कुकडे यांना केंद्र सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने  ‘निरामय’ या निवासस्थानी त्यांना भेटून शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांची गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. कुकडे म्हणाले, ‘‘एक्स रे, सोनोग्राफी, एमआरआय, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया अशा वेगवेगळ्या सुविधा देताना किंवा उपचार करताना पैसा लागतो. पण वाढलेले बिल पाहून रुग्णालयात जाऊ नये, अशी मानसिकता वाढत आहे. ती खरी आहे. पण वैद्यकीय सेवा टाळता येणार नाही. विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले तर महागडी वैद्यकीय सेवा सौम्य होईल. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांतही हा प्रश्न सुटलेला नाही.’’

गावपातळीपर्यंत पसरलेल्या सरकारच्या आरोग्य सेवा चांगल्या नाहीत, असा उगाच अपप्रचार केला जातो. तिथे काम करणारे माणसे कशी आहेत, यावर त्या सुविधेचे महत्व ठरत असते. माणसांवर काम करण्याचा संस्कार झाला असेल तर कामे होतात. सरकारने तर चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत, असे सांगून डॉ. कुकडे म्हणाले, पुण्यासारख्या शहरातून मी लातुरसारख्या ग्रामीण भागात आलो. त्यावेळी इथे अत्यंत अवघड स्थिती होती. कसल्याही सुविधा नव्हत्या. त्यामुळे अडचणी येणार हे माहिती होते. त्याकडे लक्ष न देता येथेच सामाजिक काम करायचे, हे ठरवले होते. आमची टिम होती. धडपडत आम्ही कामे करत गेलो. त्या कामाला यशही मिळत गेले. त्यामुळे नव्या पिढीतील डॉक्टरांवर सामाजिक कार्याचे संस्कार व्हायला हवेत, असे मला वाटते. त्यासाठी त्यांच्या शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत.

एकत्रित कार्याला मिळालेली ही राजमान्यता
मला पद्मभूषण जाहीर झाला, ही माझ्यासाठी अनपेक्षीत घटना होती. केंद्रिय गृह खात्यातून मला शुक्रवारी (ता. 25) दूरध्वनी आला. ‘तुम्हाला पद्मभूषण पुरस्कार आम्ही जाहीर करत आहोत. तो स्वीकाराल का?’ अशा प्रकारचा दूरध्वनी येईल, असे कधी वाटले नाही. कारण त्यासाठी मी कधी प्रयत्न केला नव्हता आणि मला कधी अपेक्षाही नव्हती. त्यामुळे मी निर्विकार होतो. माझ्या मित्रमंडळीला ही बाब कळल्यानंतर त्यांना झालेला आनंद पाहून मला काहीतरी विशेष घडले आहे, याची जाणिव झाली. खरंतर सर्वांनी मिळून केलेल्या कामाची ही पावती आहे. रूग्णालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती इथंपासून शिक्षणातील बदल, दुष्काळ-भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत केलेल्या कामाची ही पावती आहे. ही कामे करताना अनेकांचा हातभार लागला. या कामाला मिळालेली ही राजमान्यता आहे, असे मी समजतो, अशा भावना डॉ. कुकडे यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com