स्टील, सिमेंटचे भाव भिडले गगनाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न दिवसेंदिवस धूसर

उस्मानाबाद - एका बाजूला जागांचे भाव गगनाला भिडत असताना दुसऱ्या बाजूला बांधकाम साहित्याचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधिक धूसर होत चालले आहे.

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न दिवसेंदिवस धूसर

उस्मानाबाद - एका बाजूला जागांचे भाव गगनाला भिडत असताना दुसऱ्या बाजूला बांधकाम साहित्याचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधिक धूसर होत चालले आहे.

सध्या बांधकाम साहित्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून वाळू, स्टीलच्या दरात भरमसाट वाढ होत असून, सिमेंटच्या दरात अचानकपणे पन्नास रुपयांची वाढ केल्याने बांधकाम व्यावसायिकांना फटका बसला आहे. तरीही त्यांच्या चढ्या दराचा अप्रत्यक्ष तोटा ग्राहकांना बसणार आहे. सध्या या क्षेत्रात मंदी आल्याचे बोलले जात असले तरी त्यातील भाव वाढत असल्याने मोठी अडचण होणार असे दिसत आहे.  

बांधकाम क्षेत्रामध्ये मंदीचे सावट वाढलेले आहे. नवीन करप्रणाली जी.एस.टी. लागू होणार असल्याने त्याचाही किंमतीवर चांगलाच परिणाम भविष्यात दिसण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. बांधकामासाठी आवश्‍यक साहित्याच्या किंमतीत कायमच वाढ होत असल्याने त्याचा या क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार असे बोलले जात आहे. गेल्या पाच- सहा वर्षांत बांधकाम क्षेत्रात म्हणावी तशी उलाढाल झालेली नाही. त्याची विविध कारणे आहेत. त्यात अशा दरवाढीचा फटका या क्षेत्राला बसला आहे.

बांधकाम साहित्याचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी या व्यवसायाला चांगले दिवस आले असते; मात्र आता बांधकाम साहित्यच दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. तीन महिन्यांपासून स्टीलच्या दरात वाढ होत आहे. आठ दिवसांपूर्वी असलेला स्टीलचा तीन ते तीन हजार आठशेपर्यंतचा दर आता चार ते साडेचार हजार इतका झाला आहे. टनामागे दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाळूच्या दरातही मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. पूर्वी चार ब्रास वाळूची किंमत १९ हजारांवर होती, आता ती २५ हजारांच्या घरात गेली आहे. पावसाळ्यात वाळूच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. सिमेंटच्या दरात अचानक एक महिन्यात मोठी वाढ झाली असून, एका पोत्याचा दर २९० रुपयांवरून ३४० ते ३६० रुपयांवर गेला आहे. 

मजुरीही वाढली
बांधकामासाठी लागणाऱ्या गवंडी व त्यांच्या हाताखाली काम करणारे कामगार, सेंट्रिंगवाले यांच्या मजुरीमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा फटका बांधकाम करणाऱ्यांना बसला आहे.

Web Title: steel cement rate increase