बारा रुपयांत नशेचा विळखा

गौरव साळुंके
रविवार, 19 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - नशा करण्यासाठी चक्क बारा रुपयांच्या स्टिकफास्टचा वापर आता होऊ लागला आहे. अल्पवयीन मुलांपासून अनेक तरुण या नशेच्या आहारी जात आहेत. सातवीतील आपला पाल्य स्टिकफास्टची नशा करतो, अशी तक्रारच एका जागरूक पालकाने केल्याने स्थिती आणखीनच गंभीर असल्याचे व शालेय मुलांमध्येही नशापान कुप्रवृत्ती रुजत असल्याचे समोर आले आहे. 

औरंगाबाद - नशा करण्यासाठी चक्क बारा रुपयांच्या स्टिकफास्टचा वापर आता होऊ लागला आहे. अल्पवयीन मुलांपासून अनेक तरुण या नशेच्या आहारी जात आहेत. सातवीतील आपला पाल्य स्टिकफास्टची नशा करतो, अशी तक्रारच एका जागरूक पालकाने केल्याने स्थिती आणखीनच गंभीर असल्याचे व शालेय मुलांमध्येही नशापान कुप्रवृत्ती रुजत असल्याचे समोर आले आहे. 

नशेखोरीचे गांभीर्य असे, की आपला सातव्या वर्गातील विद्यार्थी ‘स्टिकफास्ट’चा नशेसाठी वापर करीत असल्याचे त्याच्या पालकाला लक्षात आले. त्याची चौकशी पालकाने केल्यानंतर त्याचे अनेक मित्रही वर्षभरापासून या नशेच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली. या प्रकाराने हादरलेल्या पालकाने मुलांच्या हाती दुकानदारांनी ‘स्टिकफास्ट’ देऊ नये अशी विनंती पोलिसांकडे केली. तसेच डॉक्‍टरांकडेही ते मुलाला घेऊन गेले. 

या नशेच्या व्यसनात अनेक मुले अडकल्याने त्यांच्या मानसिक शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांना अनेक आजार होण्याची शक्‍यता असते, अशी बाब त्यांना डॉक्‍टरांकडून सांगण्यात आली. मैदाने, गार्डन, मोकळ्या जागी ही मुले रात्री नशा करत असल्याचे दिसून आले. 
या भागात सर्रास नशा.. 

जयभवानीनगर, राजनगर, हनुमाननगर, गणेशनगर या भागांत शालेय विद्यार्थी व शाळाबाह्य मुलं याच परिसरातील दुकानांतून ‘स्टिकफास्ट’ खरेदी करतात.  निर्जनस्थळी जाऊन हातरुमालावर, प्लॉस्टिक पिशवीत ‘स्टिकफास्ट’ टाकून नाकाने गंध घेत नशा करीत असल्याचे समोर आले आहे. सातवीतील विद्यार्थ्याच्या पालकानेही मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारही केली. 

म्हणून स्टिकफास्टच 
 विक्रेते म्हणतात, ‘स्टिकफास्ट’ खरेदीसासाठी शालेय मुले अधिक येतात. 
 काही मुले रोज रात्री दोन ‘स्टिकफास्ट’ नेतात. 
 ‘स्टिकफास्ट’ किराणा दुकान, मेडिकल, हार्डवेअर, जनरल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध. 
 ‘स्टिकफास्ट’मध्ये असलेले घटक त्यावर लिहिलेले नाहीत. 
 ‘स्टिकफास्ट’ची किंमत फक्त १२ रुपये, त्यामुळे घेणे सहज शक्‍य.

व्यसनात अडकलेल्या मुलांचा शिक्षणातील रस समजून घेणे गरजेचे आहे. बहुधा अशी मुले कुटुंबाच्या प्रेमापासून पारखे झालेली असावीत, त्यांचे भावनिक वंचन होतेय का, हे तपासणे आवश्‍यक आहे. व्यसनात अडकलेल्या मुलांना शिक्षा करण्यापेक्षा प्रेमाने समजावून या प्रकाराच्या गांभीर्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे ठरेल. 
- डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ. 

Web Title: Stickfast use for addiction