सात महिन्यांचे देयक थकल्याने वाहन सेवा बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

उस्मानाबाद  - राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या वाहनांचे देयक थकविल्याने चालकांनी एक जानेवारीपासून सेवा बंद केली आहे. 

उस्मानाबाद  - राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या वाहनांचे देयक थकविल्याने चालकांनी एक जानेवारीपासून सेवा बंद केली आहे. 

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने बालकांसाठी आरोग्य सुविधा पुरविली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या दौरे, पाहणी, शिबिरासह अन्य उपक्रमांसाठी वाहने वर्षभराच्या करारावर घेण्यात आली आहेत. सध्या या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाकडे एकूण 20 वाहने आहेत. मात्र या वाहनांचे सात महिन्यांचे देयक मंजूर करूनही रक्कम दिली गेली नाही. साधारण एका वाहनासाठी महिन्याला 23 हजार रुपये दिले जातात. महिन्याकाळी एकूण 20 वाहनांचे देयक चार लाख साठ हजार एवढे होत. मात्र सात महिन्यांचे एकूण 32 लाख 20 हजार रुपयांची रक्कम थकल्याने अडचणी येत आहे. त्यातही अधिकचे दौऱ्याचे चार लाखांवर रकमेचे देयक थकले आहे, अशी एकूण 36 लाख रुपयांची रक्कम थकल्याने गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी देयक थकल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांचा निषेध करीत चालकांनी सेवा बंद केली होती. तेव्हा काही रक्कम अदा करून वाहन सेवा सुरू करण्यात सांगण्यात आले होते; मात्र पुन्हा तसाच प्रकार घडल्याने चालक संतप्त झाले आहेत. वाहन सेवा बंद करण्यापूर्वी चालकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांना निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. 

गेल्या चार दिवसांपासून वाहन सेवा बंद असल्यामुळे या माध्यमातून होणारे दौरे, कार्यक्रम रखडले आहेत. पर्यायी यंत्रणा शोधण्यातही प्रशासनाला अपयश आल्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. 

प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही दखल घेतली जात नाही. गेल्या वर्षभरापासून देयक वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणी येत आहे. 
- अण्णासाहेब गाडे, कंत्राटदार. 

वाहनांचे करार संपल्यानंतर सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता मुदतवाढीचा कालावधी संपल्याने करार संपुष्टात आला आहे. थकीत देयकामध्ये त्रुटी असून, ते दुरुस्तीनंतर नव्याने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र संबंधितांनी अद्याप सादर केले नाही. नवीन कंत्राटदार लवकर सेवा देणार असून, त्यानंतर सेवा पूर्ववत होईल. 
डॉ.एकनाथ माले - जिल्हा शल्यचिकित्सक 

Web Title: Stop vehicle service