पाण्यासाठी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको 

माधव इतबारे
सोमवार, 1 एप्रिल 2019

सिडको एन-5 भागात चौथ्या दिवशी पाणी दिले जाते. त्यानुसार रविवारी (ता. 31) सकाळी पाणी येणे अपेक्षित होते. मात्र नळाला पाणी आले नाही. त्यामुळे संतप्त नागरीकांनी रास्ता रोको केले. 

औरंगाबाद : सिडको एन-5 भागात तब्बल सहाव्या दिवशी देखील नळांना पाणी आले नसल्याने संतप्त नागरिकांनी सकाळीच रस्त्यावर उतरून चिश्‍तीया चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापौर नंदकुमार घोडेले, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, एम. बी. काझी यांच्यासह अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाणी वेळेवर देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. 

सिडको एन-5 भागात चौथ्या दिवशी पाणी दिले जाते. त्यानुसार रविवारी (ता. 31) सकाळी पाणी येणे अपेक्षित होते. मात्र नळाला पाणी आले नाही. नागरिकांना उद्या म्हणजे सोमवारी (ता. 1) पाणी येईल, असे सांगण्यात आले. सकाळी सहा वाजता पाण्याची वेळ होती. मात्र सातवाजेपर्यंत पाणी न आल्याने नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रस्त्यावर उतरत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त नागरिकांनी वाहनांचे टायर जाळून वाहने रोखून धरली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. 
 

Web Title: Stop the way of angry citizens for lack of water in aurangabad