उस्मानाबादला वादळी पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

उस्मानाबाद - उन्हाचा पारा चढलेला असताना उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीज कोसळून महिला जखमी झाली. अशाच अन्य घटनांत दोन बैल दगावले. कडबा, आंब्याचे नुकसान झाले.

उमरगा शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह दोन तास अवकाळी पाऊस झाला. शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीतील सुमारे पंधरा घरांवरील पत्रे उडाली. वीजखांब, झाडे उन्मळल्याने काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्‍यातील मुळज, गुंजोटी, औराद, कदेर, भुसणी, मुरळी, वागदरी, त्रिकोळी, मुरूम, चिंचोली (ज.), डिग्गी, बेडगा, एकोंडी, तुरोरी परिसरात जोरदार पावसाने आंब्याचे नुकसान झाले. घरावर वीज पडल्याने मुळज येथील रेखा शिवाजी सूर्यवंशी (४०) गंभीर जखमी झाल्या. 

गुंजोटी, गुंजोटीवाडीसह औराद परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. काही घरांवरील पत्रे उडाली. जेवळी (ता. लोहारा) येथे मेघगर्जनेसह २५ मिनिटे, तर अनाळा (ता. परंडा) येथे पंधरा मिनिटे पाऊस झाला. तुळजापूर शहरासह परिसरातही पावसाने हजेरी लावली. वादळामुळे कडब्याच्या गंजी विस्कटल्या, आंब्याचे मोठे नुकसान झाले. वीज कोसळल्याने शहापूर (ता. तुळजापूर) येथे झाडाखाली बांधलेले दोन बैल दगावले.

Web Title: storm rain loss