पहाटेपासून रात्रीपर्यंत केला वीस गावांत प्रचार

कल्याण काळे
कल्याण काळे

फुलंब्री  (जि.औरंगाबाद) : पहाटे उठून योगा, स्नान करायचे व लगेच गावोगावी प्रचाराला निघायचे हा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचा गेल्या काही दिवसांपासूनचा नित्यनियम बनला आहे. रस्त्यात दिसेल त्याची भेट घेणे, गावोगावी सभा, कोपरा बैठका, पदयात्रांद्वारे प्रचार करणे हे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालू असते. बुधवारी पहाटेपासून रात्रीपर्यंत त्यांनी तब्बल वीस गावांत प्रचार केला.

डॉ. काळे यांनी पहाटे पाचला उठून योगा केला. नंतर स्नान करून लगेच बाहेर पडण्याची तयारी केली. बाहेर पडताच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांचे वाहन चालकासह प्रचाराला निघण्यासाठी तयारच होते. बुधवारी (ता.16) सकाळी साडेसहाला ते प्रचारासाठी रवाना झाले. एक दिवसांपूर्वीच प्रचार दौऱ्याची संपूर्ण माहिती पदाधिकारी, कार्यकर्ते, चालक यांना दिली जाते. त्याचप्रमाणे चालकाने गाडी फुलंब्रीच्या दिशेने वळवली. गाडीतच प्रचाराची रूपरेषा ठरली. प्रचारासाठी पहिले गाव म्हणून नायगावला साडेसातला ते पोचले. गावाच्या वेशीत गाडी पोचताच पक्षाचे शेकडो कार्यकर्ते पक्षाचे झेंडे हातात घेऊन तयार होते. कार्यकर्त्यांनी गावात सर्वांना प्रचाराची माहिती देऊन डॉ. काळे आपल्या गावात आल्याची माहिती दिली.

त्यानुसार कार्यकर्त्यांची जमवाजमव झाली. हे गाव मुस्लिमबहुल आहे. डॉ. काळे यांनी हिंदी भाषेत थेट मतदारांशी संवाद साधला. येथील छोटेखानी सभा आटोपल्यानंतर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनतर लगेच पुढच्या सावंगी गावी रवाना झाले. इथे पोचल्यावरही कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी तयारच होते. स्वागतानंतर प्रचाराची दिशा ठरली. कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करीत होते. डॉ. काळे यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला बळ देऊन प्रोत्साहित केले. प्रचार फेरी संपल्यानंतर पुढील जटवाडा गावाकडे जाण्यासाठी ते निघाले. रस्त्याने जाताना एका ठिकाणी एक शेतकरी कुटुंब मका सोंगणी करीत होते. गाड्यांचा ताफा येथे थांबला. डॉ. काळे यांनी शेतकरी कुटुंबाची थेट बांधावर जाऊन भेट घेत पीक पाण्याची विचारपूस केली.

घरात कोण कोण असते, कोण काय करते, आई-वडील कसे आहेत अशी विचारणा करून त्या शेतकरी कुटुंबाला आपलेसे करण्याचा प्रयत्न डॉ. काळे यांनी केला. बारकाईने शेतकऱ्याची विचारपूस करीत असताना एका झाडाखाली वयोवृद्ध आजोबा बसलेले दिसले. डॉ. काळे यांनी त्यांच्याकडे जाऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी भावुक झालेल्या आजोबांनी "विजयी भव' असा आशीर्वाद दिला. त्यावेळी डॉ. काळे यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्यानंतर पुढील रहाळपट्टी तांडा येथे दौऱ्यासाठी जाताच येथे कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी आठवणीला उजाळा देण्यात आला. गावात प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी डॉ. काळे यांना औक्षण केले. त्यामुळे ते काही वेळ भावुक झाले होते. नंतर पुन्हा पुढच्या गावी डॉ. काळे यांचा ताफा रवाना झाला.


दिवसभरात 20 गावांचा दौरा

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील नायगाव, सावंगी, जटवाडा, रहाळपट्टी तांडा, धोपटेश्वर, ओहर, गावदरी तांडा, कृष्णपूरवाडी, कोलठाण, पोखरी, पळशी, बकापूर, श्‍यामवाडी, माहोली, पिसादेवी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, परदरी, निपाणी या वीस गावांचा दौरा बुधवारी करण्यात आला. या दौऱ्यात त्यांना प्रत्येक गावात प्रतिसाद मिळाला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com