लेव्ही वसुली नाके एकाच वेळी केले उद्‌ध्वस्त

बाळासाहेब लोणे
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा निजामाच्या
अधिपत्याखाली होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या
राजवटीतून मुक्‍त झाला. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात
सर्वत्र मुक्‍तिदिन म्हणून साजरा केला जातो. या संग्रामात तालुक्‍यातील
स्वातंत्र्यसेनानींनी जिवाची बाजी लावली.

गंगापूर (जि.औरंगाबाद) : देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा निजामाच्या
अधिपत्याखाली होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या
राजवटीतून मुक्‍त झाला. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात
सर्वत्र मुक्‍तिदिन म्हणून साजरा केला जातो. या संग्रामात तालुक्‍यातील
स्वातंत्र्यसेनानींनी जिवाची बाजी लावली.

काटेपिंपळगाव (ता. गंगापूर) येथील स्वातंत्र्यसैनिक (कै.) भाऊराव
पाटील धोत्रे यांच्या जीवनावर आधारित लेखक सागर घोनशेट्टे
लिखित "स्वयंसिद्ध समिधा' या पुस्तकाचे त्यांचे नातू योगेश धोत्रे,
यांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत यांच्या हस्ते प्रकाशन केले आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासाचा उलगडा झाला आहे. यातील
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक (कै.) लक्ष्मणराव शिंदे यांचे वर्ष 2017 मध्ये वयाच्या 103व्या
वर्षी निधन झाले. निजामी राजवटीविरोधात नेवरगाव (ता. गंगापूर)
येथे एक हजार जनसमूहाने पोलिसांसमोरच चावडीवर तिरंगी ध्वज फडकावला. 14 नोव्हेंबर 1947 रोजी तालुक्‍यातील 18 करोडगिरीवर हल्ला चढवत लेव्ही वसुलीचे नाके एकाच वेळी उद्‌ध्वस्त करण्यात आले. यात रामप्रसाद नावंदर, भाऊराव पाटील काटेपिंपळगावकर, रामगोपाल नावंदर, लक्ष्मणराव शिंदे, काशीनाथ हैबतकर, रामकिशन पारिक, काशीनाथ भिल्ल, शंकर भिल्ल, रेवजी भिल्ल, आसाराम कुमावत,
वसंतराव राक्षसभुवनकर, शंकरलाल लाहोटी यांच्यासह भिल्ल समाजाचे मोठे
योगदान राहिले. रामगोपाल नावंदर यांच्या नेतृत्वात सावकाराच्या
गुमास्त्याने लिहिलेले प्रत्येक खेड्यातील दप्तर जाळण्यात आले व "स्टेट
कॉंग्रेस जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या.

या मोहिमेत वसंतराव राक्षसभुवनकर यांनी भूमिगत राहून काम केले. निजामी
राजवटीत होत असलेल्या अन्यायाची जाणीव ग्रामीण भागातील जनतेला व्हावी
यासाठी ठिकठिकाणी प्रबोधनपर भाषणे, गणेशोत्सवात नाटके
प्रभावी माध्यम ठरू लागले. भाऊराव पाटील यांच्या प्रभावी कीर्तनाने ग्रामीण भागात निजाम राजवटीविरोधात गावागावात वातावरण पेटले होते. सात ऑगस्ट 1947 ला महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाने गंगापूरच्या विठ्ठल मंदिरासमोर पहिला सत्याग्रह करण्यात आला.

यासाठी शंकरलालजी लाहोटी व आसाराम कुमावत यांनी पुढाकार घेतला.
यामध्ये मुरलीधर कुमावत यांच्या पायाला जखम झाली होती. तसेच, सभाबंदी
मोडल्याचे खोटे खटले चालवत काहींना सहा महिन्यांसाठी तुरुंगात डांबण्यात
आले. सरहद्दीच्या पलीकडे लक्ष्मणराव पाटील, रामकिशन पारिख, गजानन कसाने,
विष्णुपंत नेवरगावकर यांच्या संरक्षणात सुरू असलेल्या शिबिरावर
निजमाच्या पोलिसांनी गोळीबार करीत छापा मारण्याचा अयशस्वी प्रयत्न
केला. लासूर स्टेशन येथील फोनच्या तारा तोडण्याचा व पूल उद्‌ध्ववस्त करण्याचा
प्रयत्न रामगोपाल नावंदर, लक्ष्मण पाटील, जयनारायण नावंदर यांनी केला.
परंतु, सहकार्य न मिळाल्याने हे दोन्ही प्रयत्न सोडून द्यावे लागले.
येथील लक्ष्मीनारायण नावंदर व एकनाथ साबू हे दैनंदिन पत्रव्यवहारचे कार्य
सांभाळीत, यामध्ये मोठा धोका होता. पुढे 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा
निजामाच्या राजवटीतून मुक्‍त झाल्यानंतर हे राज्य अखंड भारतात विलीन
करण्यात आले.

बैलगाडीतून नेवासा येथे
संपत्ती नेण्यास केली मदत

संपत्तीच्या सुरक्षिततेसाठी येथील धनिक लोकांनी करोडगिरी नाका चुकवून
बैलगाडीतून संपत्ती नेवासा येथे नेण्याचा प्रयत्न केला. रात्री बारा
वाजता बैलगाडी नदीत उतरवली. पाच फूट पाणी आणि चार मोठे बैल असूनही
गाडी रेटत नव्हती. सकाळ झाल्यास निजामानो बघितल्यास संपत्ती जप्त होईल,
या भीतीपोटी शेठजींनी टोका येथे शिबिरात येऊन रामगोपाल नावंदर, मुरलीधर
कुमावत, आसाराम कुमावत यांना गाडी अडकल्याचे सांगितले. नावंदर यांनी
शंकरलाल लाहोटी, जयनारायण नावंदर, लक्ष्मणराव पाटील, लक्ष्मणराव शिंदे,
रामकिसन पारिख, गजानन कसाने यांना कोणत्याही परिस्थितीत गाडी काढण्याचे
आदेश फर्मावले. त्यानुसार बाहेरील गावातून दहा माणसे बोलावून तीन
खेपांमध्ये सामान पाठीवरून सुखरूप आणले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story About Marathwada Mukti Sangram Din