केमिकलची धडपड, सर्कलची सरशी

केमिकलची धडपड, सर्कलची सरशी

‘पुरातत्त्व’ची नवी भव्य इमारत - ४० दालने, २ कॉन्फरन्स हॉल, विद्यापीठ परिसरातून चालणार कारभार

औरंगाबाद - ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’चा कारभार आता बिबी का मकबऱ्यातील बराकीऐवजी स्वतःच्या भव्य दुमजली इमारतीतून चालणार आहे. विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या चकचकीत इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, मंडल कार्यालय आणि रासायनिक शाखा एकाच ठिकाणी येणार आहेत; पण ‘एकाच्या तपाचे दुसऱ्याला फळ’ अशीच या कार्यालयाची कथा आहे.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या या इमारतीची कहाणीच मोठी मजेशीर. १९६४ पासून बिबी का मकबऱ्याच्या बराकीतून सुरू असलेले या विभागाचे कामकाज आता भव्य दुमजली चकचकीत इमारतीतून चालेल; पण यामागे तपश्‍चर्या आहे, ती दुसऱ्याच विभागाची. औरंगाबाद मंडल कार्यालयाबरोबरच मकबरा परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या रासायनिक विभागाचे वेस्टर्न झोनल ऑफिसही आहे.

अजिंठा लेण्यांच्या रासायनिक संवर्धनाबरोबरच पश्‍चिम भारतातील सर्व स्मारकांच्या जतनाची रासायनिक प्रक्रिया या ठिकाणाहूनच होते. रासायनिक पुरातत्त्वज्ञ इथल्या प्रयोगशाळांतून काम करतात.

या रासायनिक शाखेने आपल्या विभागीय कार्यालयासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सुमारे १० वर्षांपूर्वी जागेची मागणी केली. विद्यापीठातील संशोधकांनाही या ठिकाणी संशोधनाची दारे खुली होतील, या हेतूने तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या मंजुरीने ९९ वर्षांच्या भाडेकरारावर त्यांना जागा मिळाली. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दाखल झाला. आराखडा मंजूर झाला. केंद्रीय कार्यालयाने भरघोस निधीही मंजूर केला; पण प्रस्तावित जागेवर होते झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण. विद्यापीठाच्या नंदनवन कॉलनीला लागून असलेल्या या जागेवरील अतिक्रमण पोलिसांकडे खेटे घालून, नाना खटपटी करून काढले गेले. इमारतीचे कामही सुरू झाले.

रसायन शाखेचे तत्कालीन अधीक्षक डॉ. मॅनेजर सिंग, सहायक रसायन पुरातत्त्वविद्‌ दीपक गुप्ता यांच्या प्रयत्नांती निधी मंजुरी, इमारतीची उभारणी वगैरे कामेही पूर्ण झाली. दरम्यान, मंडल कार्यालयानेही नव्या जागेचा शोध सुरू केला होता. ऑफिस क्वार्टरमधील मोकळी जागा, पदमपुरा वगैरे भागांतही पाहणी करण्यात आली; पण काही निश्‍चित झाले नाही. अशातच सुटीचा काळ घालवायला गेल्या वर्षी औरंगाबादला आलेल्या विभागाच्या सह महासंचालकांनी नव्या इमारतीचे काम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मंडल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना इमारत दाखवली.
याच काळात दिल्ली मुख्यालयातील सरकारी शंका सुरू झाल्या. इमारतीचा ताबा घेण्याची वेळ आल्यावर ‘कर्मचारी संख्या आणि क्षमतेपेक्षा इमारत खूपच मोठी झाली. एवढ्या इमारतीला मंजुरी कशी मिळाली?’ असे प्रश्‍न विचारले गेले. त्याच काळात हे कार्यालय पाहिलेल्या सह महासंचालकांनी रसायन शाखेबरोबरच मंडल कार्यालयही इथेच हलवावे, अशी सूचना पुढे सरकवली आणि रसायन विभागाच्या मेहनतीने उभे राहिलेली ही इमारत अलगदपणे मंडल कार्यालयाच्या पदरी पडली.

आपसातच राजीखुशी होऊन आता खालचा मजला रसायन शाखेला आणि वरचा मजला मंडल कार्यालयाला, अशी विभागणी झाली आहे. काही दिवसांतच मकबऱ्याच्या सराई आणि बराकीतून ही दोन्ही कार्यालये नव्या इमारतीत स्थलांतरित होतील.

अशी आहे  रचना
दुमजली भव्य इमारतीत ४० खोल्या, दोन कॉन्फरन्स हॉल, स्टाफ मीटिंग हॉल, अधिकाऱ्यांच्या केबिन अशी रचना आहे. रासायनिक शाखेचा विस्तार झाला, तर इमारत उपयोगात येईल, असा युक्तिवाद रसायन शाखेने करून पाहिला; पण चार-पाच कर्मचाऱ्यांच्या शाखेचा विस्तार कितीही झाला, तरी वीसेक खोल्याही पुरून उरतील, असे उत्तर मिळाले. प्रस्ताव पारित करताना, निधी मंजूर करताना, या बाबी मुख्यालयाने विचारात कशा घेतल्या नाहीत, हे कोडेच आहे.

संशोधक, विद्यार्थ्यांना होईल फायदा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील संशोधक, संग्रहालयशास्त्राचे विद्यार्थी, उदारकला विभागाने नव्याने सुरू केलेल्या पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्यासाठी हे कार्यालय उपयोगी ठरेल. शिवाय रसायन शाखेच्या प्रयोगशाळांतून विद्यापीठाच्या केमिस्ट्री, केमिकल टेक्‍नॉलॉजीचे विद्यार्थीही संशोधन करू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com