कथा गरवारे क्रीडा संकुलाची

कथा गरवारे क्रीडा संकुलाची

साल 1994 मध्ये मी गरवारे उद्योग समूहात काम करीत होतो. तसं आजही मी समूहात आहे; पण त्या वेळी पगारदार अधिकारी होतो. अनेक ज्येष्ठ सरकारी अधिकारी माझे जवळचे मित्र. श्री. कृष्णा भोगे त्यांतलेच एक. त्या वेळी ते औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक होते. कारखान्यात जाताना सहज म्हणून चहा घ्यायला भोगे साहेबांच्या बंगल्यावर गेलो. उद्योग-व्यापार क्षेत्रांतील लोकांना गमतीने अधूनमधून शाब्दिक चिमटे काढणे, हा त्यांचा आवडचा छंद. "का हो, आमच्या शहरासाठी तुम्ही उद्योगपती काही करणार आहात का? की तुम्हाला आमचे शहर आणि तिथल्या लोकांशी काही घेणं-देणं नाही?'


"आमचं काही चुकलं का?' हातातला चहाचा कप बाजूला ठेवून, मी विचारलं.
उत्तरादाखल भोगेसाहेब बोलले, ते असे, की चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीने क्रीडांगणासाठी तीस एकर जागा महापालिकेला दिली असून, त्या ठिकाणी क्रीडासंकुलाच्या उभारणीची संकल्पना आहे... आणि त्या दिवशी 10.30 वाजता सादर केल्या जाणाऱ्या अंदाजपत्रकात भोगेसाहेब प्रस्तावित क्रीडासंकुलासाठी भरीव तरतूद करू इच्छित होते.
कधीकाळी सरकारी नोकरीत काम केल्यामुळे मीही त्यांना एवढंच मोघम उत्तर दिलं, की निश्‍चित प्रस्ताव आला, तर मी श्री. शशिकांत गरवारे यांच्याकडे पाठवीन आणि गरवारे उद्योग समूहातून काही भरीव योगदान मिळवून देण्याचा प्रयत्न करीन.
"अशा उधार गोष्टी सांगू नका,' भोगेसाहेब उद्‌गारले, "देणार असाल तर अर्ध्या तासात तसं सांगा.'
"इतक्‍या लवकर उत्तराची अपेक्षा करू नका; तरीही प्रयत्न करतो,' असं त्यांना सांगून मी माझी तात्पुरती का होईना सुटका करून घेतली.


... पण माझे विचारचक्र सुरूच होते. कारखान्यात आलो. खुर्चीत बसलो आणि गरवारे साहेबांना फोन केला. त्यांच्या आम्हाला कायमस्वरूपी सूचना असत- माझ्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट मला कळवत चला. हो म्हणणे, नाही म्हणणे किंवा विचार करणे हे मी बघेन. फोनवर जाणवलं... साहेब एकदम छान मूडमध्ये होते. खरं तर असं क्वचितच घडायचं, की त्यांचा मूड चांगला नसावा. मी संकल्पना सांगताच त्यांनी म्हटलं, "गवळी तुमचं मत सांगा.' मी सांगितलं, "आपण हे अवश्‍य करावे. त्याची कारणं तीन- प्रस्तावित क्रीडा संकुलाची जागा कारखान्याच्या शेजारी आहे. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील पहिल्या काही उद्योगांपैकी आपण एक आहोत आणि औरंगाबाद शहरात समाजोपयोगी उपक्रमात आपला दृश्‍य सहभाग अद्याप नाही.' क्षणाचाही विलंब न लावता साहेब उद्‌गारले, "मग अकरा लाख रुपयांचा चेक आणि पन्नास लाख रुपयांचं आपलं एकूण योगदान याविषयी आजच पत्र देऊन टाका.'
पंधरा मिनिटांत कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून माझे तेव्हाचे स्वीय सहायक अकरा लाख रुपयांचा चेक आणि पत्र घेऊन भोगे साहेबांकडे रवाना झाले. भोगे साहेबांना अंदाजपत्रक सादर करायला अजूनही पंधरा मिनिटं शिल्लक होती. प्रत्यक्ष बोलले नसले, तरी उद्योग आणि उद्योगपतींविषयी भोगे साहेबांची मतं त्या दिवशी कदाचित थोडीफार बदलली असावीत.

त्यानंतर आठ दिवसांनी गरवारे साहेबांनी मला मुंबईला बोलावलं आणि प्रत्यक्ष भेटून या क्रीडा संकुलाची संकल्पना त्यांच्या मातोश्री श्रीमती विमलाबाई गरवारे यांच्यापुढे मांडायला सांगितली. त्यांनी शांतपणे संपूर्ण प्रस्ताव ऐकून घेऊन त्याला आपले आशीर्वाद आणि मान्यता दिली. ती त्यांच्याशी माझी पहिली आणि दुर्दैवाने शेवटची भेट ठरली.
काही दिवसांनी भोगेसाहेबांच्या सहकार्याने क्रीडा संकुलाची संकल्पना तयार झाली. शहरातील सर्व अधिकृत क्रीडा संघटनांना सहभागी करून घेण्याचा निश्‍चित असा विचार पुढे आला. क्रीडा संकुलाची मालकी महापालिकेची असली, तरीही दैनंदिन व्यवस्थापनासाठी, त्याचे धोरण निश्‍चित करण्यासाठी एक समिती असावी असेही ठरले. त्या समितीत महापालिकेचे आयुक्त, पदाधिकारी, क्रीडा संघटनांचे एखादे-दोन प्रतिनिधी असावेत असेही ठरले. सदरच्या समितीत असलेला गरवारे उद्योग समूहाचा प्रतिनिधी समितीचा सदस्य सचिव असेल असेही ठरले. नंतर काही वर्षांनी या विषयी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी महापालिकेशी केलेला पत्रव्यवहार एकतर्फीच ठरला. आम्ही लिहिलेल्या पत्रांची पोहोच द्यायलाही त्यांना वेळ न मिळाल्याने उत्तर देणे किंवा कार्यवाही करणे याचा प्रश्‍नच उद्‌भवला नाही.


आयुष्यात अनेक बरे-वाईट अनुभव आले. त्यांतला हा एक महत्त्वाचा आणि शिकवण देऊन जाणारा होता. भोगेसाहेबांसारखे एक निःस्पृह आणि कर्तव्यतत्पर अधिकारी मनाने अधिक जवळ आले. कौटुंबिक स्नेही झाले. याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या केवळ औद्योगिकच नव्हे, तर शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीला बळ देणारे गरवारे कुटुंबातील श्री. शशिकांत गरवारे आणि कै. विमलाबाई गरवारे या मायलेकरांच्या जोडीला एकत्र भेटून, त्यांची उदारता आणि दूरदृष्टी यांचा एकत्रित अनुभव घेता आला.


थोडं विषयांतर होईल; पण तरीही भोगे साहेबांच्या बोलण्याच्या परिणामकारक पद्धतीविषयी एक छोटासा किस्सा येथे सांगू इच्छितो... ते नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांच्या दालनाच्या एका कोपऱ्यातील सोफ्यावर मी बसलो होतो. सगळ्याच मनपा आयुक्तांच्या कार्यालयांत असते तशीच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची वर्दळ आणि राजी-नाराजीची चर्चा सुरू होती. एका प्रस्तावाला समोर बसलेल्या नगरसेवकांचा विरोध पाहून, भोगे साहेब उद्‌गारले, ""हे पहा. आम्ही अधिकारी मंडळी काही दिवसांसाठीच येतो. तुमच्या स्थानिक राजकारणाशी आमचा संबंध नसतो. आम्हाला काम करू द्या. आमच्या नागपूर-विदर्भाकडे नाशिकची ओळख "क्रियाकर्माचं शहर' अशी आहे. कुणी नाशिकला जाऊन आलो असं सांगितलं, की आम्ही अगदी पहिले सांगणाऱ्याच्या डोक्‍यावर केस आहेत का पाहतो. जमलं तर आपण सगळे मिळून तुमच्या शहराची ही ओळख बदलूया.''
उपस्थित मंडळींनी त्वरित भोगेसाहेबांचा जो काही प्रस्ताव होता, तो मान्य केला हे ओघाने आलेच. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com