मोकाट कुत्र्यांनी पाडला वीस शेळ्यांचा फडशा

मोकाट कुत्र्यांनी पाडला वीस शेळ्यांचा फडशा

सोयगाव (जि.औरंगाबाद) ः जरंडी (ता. सोयगाव) गावालगतच्या पटेलनगरात झोपडीत बांधून ठेवलेल्या वीस शेळ्यांवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला. ही घटना मंगळवारी (ता.आठ) दुपारी घडली. शेळ्यांचे मालक घरी नसल्याची संधी साधून झोपड्यात शिरून या मोकाट कुत्र्यांनी वीस शेळ्या फस्त केल्या.

जरंडी गावापासून हाकेच्या अंतरावर पटेलनगर वसाहत आहे. पशुपालक शेतकरी आनंदा लक्ष्मण गवळे (कोळी) यांच्या झोपडीवजा गोठ्यात वीस शेळ्या बांधून ठेवल्या. झोपडीबाहेरील दरवाजा लावून त्यांनी शेळ्यांना आत डांबून ठेवले व ते शेतात गेले. गावातील तब्बल तीसच्या वर मोकाट कुत्र्यांनी या झोपडीबाहेरचा दरवाजा तोडून आतील वीस शेळ्यांवर हल्ला चढवून त्यांना फस्त केले. यामध्ये आनंदा गवळे यांच्यासह इस्माइल पटेल, बाबू पटेल यांच्याही पाच शेळ्या होत्या. दरम्यान, या घटनेने जरंडी गाव, परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली असून, ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे एक लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पशुसंवर्धन विभागाने रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा न केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मोकाट कुत्र्यांचा
बंदोबस्त करण्याची मागणी

जरंडी गावात सर्वत्र मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यांची दहशत वाढतच आहे. त्यामुळे तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com