आले मनाला, लावले कामाला...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

औरंगाबाद - शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेने एलईडी प्रकल्पाच्या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, त्यासाठी अद्याप लेखी करार झालेला नाही व दरही ठरलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी करार अंतिम करून प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश महापौरांनी सोमवारी (ता. सात) प्रशासनाला दिले.

शहरातील जुने पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी पथदिवे लावणे व त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिने १२० कोटी रुपयांमध्ये मे. इलेक्‍ट्रॉन एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यंत सुमारे १५ हजार पथदिवे लावल्याचे सांगितले जात आहे. 

एकीकडे एलईडीचे अवाढव्य कंत्राट व दुसरीकडे जुन्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका १४ कंत्राटदारांवर उधळपट्टी करत होती. त्यात एक जानेवारीपासूनच एलईडी कंत्राटदाराकडे दिल्याने या उधळपट्टीला लगाम बसला. 

मात्र, महापालिकेने एलईडी कंत्राटदारासोबत अद्यापही लेखी करार केलेला नाही. शिवाय, देखभाल दुरुस्तीचे दरपत्रकही ठरवलेले नाही. त्यामुळे कंत्राटदाराने देखभालीची जबाबदारी स्वीकारलेली नाही. करार आणि दरपत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतरच काम हाती घेतले जाईल, या अटीवर कंत्राटदार अडून बसल्याचे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना माहिती देताना सांगितले. त्यावर लेखी करार लवकरात लवकर करा, तसेच दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे दरपत्रक ठरवून ते मंजुरीसाठी आगामी १८ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे प्रशासनाला आदेशित केले.

दिव्याखाली अंधार
दोन एजन्सींच्या घोळात शहरातील अनेक पथदिवे बंद आहेत. एलईडीच्या कंत्राटदाराला पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी दिल्यापासून कॉम्प्रेसिव्हच्या १४ कंत्राटदारांनी काम थांबवले आहे. दुसरीकडे एलईडीच्या कंत्राटदारानेही लेखी कराराअभावी काम सुरू केले नाही. त्यामुळे बंद पथदिव्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

Web Title: Streetlight repairing work municipal