Streets for People Challenge : औरंगाबादेतील रस्त्यांबाबत लोक म्हणतात 'मुलांसाठी पाहीजे सुरक्षित जागा' 

मधुकर कांबळे
Wednesday, 2 December 2020

९४ टक्के लोक म्हणतात 'रस्ता मोकळा हवा'; ८३ टक्के लोकांचे मत 'मुलांसाठी पाहीजे सुरक्षित जागा'
   

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाकडून स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजअंतर्गत रस्त्याबद्दल नागरिकांना काय वाटते याच्या अपेक्षा जाणून घेतल्या. त्यात ९४ टक्के नागरिकांनी रस्ते मोकळे अतिक्रमणमुक्त असावेत, तर ८३ टक्के नागरिकांनी मुलांसाठी रस्त्यावर सुरक्षित जागा असावी असे मत व्यक्‍त केले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीझन मिशनने सुरू केलेल्या देशव्यापी स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजमध्ये औरंगाबाद महापालिकेने सहभाग नोंदवला आहे. याचाच एक भाग म्हणुन महापालिका प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या नेतृत्वात शहरातील विविध रस्त्यांचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण करणे, हिरवळ फुलवणे आणि पादचाऱ्यांसाठी अनुकूल फुटपाथ तयार करण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासाठीच एएससीडीसीएलने सर्वेक्षणाच्या माध्यमातुन नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. ऑनलाइन झालेल्या सर्वेक्षणात २८६ नागरिकांनी सहभाग नोंदवला. स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजचे प्रमुख असलेल्या एएससीडीसीएलच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा मोहन नायर यांनी याबाबत सांगितले की, या सर्वेक्षणातून शहरातील नागरिक रस्त्यांच्या कायापालट करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. पादचाऱ्यांना वाहतुकीस अडथळा आणण्यापासून रस्ते सुरक्षित करण्याची आवश्यकता या सर्वेक्षणात नागरिकांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तरूण वर्गाचा अधिक प्रतिसाद 
या सर्वेक्षणात सर्वाधिक प्रतिसाद १९ ते ३५ वर्षीय तरूणांकडून मिळाला. ३६ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिक दुसऱ्या क्रमांकावर होते. सर्वेक्षणातील ७८ टक्के नागरिकांना त्यांच्या घरापासून चालण्यासाठी ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर पार्क किंवा मोकळी जागा अपेक्षित आहे. रस्त्यांवरील फुटपाथ आणि पार्किंगसाठी एक पर्याय निवडताना ७० टक्के लोकांनी फुटपाथ निवडला. तर ३० टक्के लोकांनी रस्त्यावर पार्किंगसाठी जागा हवी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Streets for People Challenge Aurangabad People say Safe place for children