'समस्यांना तोंड देण्याचे महिलांमध्ये सामर्थ्य'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

लातूर - स्त्रियांमध्ये निसर्गत:च प्रचंड सामर्थ्य असते. त्या सामर्थ्याच्या जोरावर त्या कोणतीही संकटे व समस्यांचा सामना करू शकतात. त्यासोबत त्यांच्यात तितकीच विनयशीलता असते, जी त्यांना नेहमीच पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जय गोरे यांनी केले.

लातूर - स्त्रियांमध्ये निसर्गत:च प्रचंड सामर्थ्य असते. त्या सामर्थ्याच्या जोरावर त्या कोणतीही संकटे व समस्यांचा सामना करू शकतात. त्यासोबत त्यांच्यात तितकीच विनयशीलता असते, जी त्यांना नेहमीच पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जय गोरे यांनी केले.

विश्‍वशांती केंद्र व माईर्स एमआयटीतर्फे शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्माच्या समन्वयातून समाजप्रबोधन व आदर्श कार्य करणाऱ्या महिलांना पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने रामेश्‍वर (रुई, ता. लातूर) येथे सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ. गोरे बोलत होते. माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील अध्यक्षस्थानी होते. विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. अशोक कुकडे, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, रमेश कराड, डॉ. मंगेश कराड, तुळशीराम कराड, काशीराम कराड व डॉ. हणमंत कराड उपस्थित होते.  

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य (पुणे), शिक्षणतज्ज्ञ डॉ. जोस्का बंडर्स (द नेदरलॅंडस्‌), आध्यात्मिक कार्यातील डॉ. मेहेर मास्टर मूस (मुंबई), डॉ. ज्योत्स्ना अशोक कुकडे (लातूर) व भारूडकार चंदाताई तिवाडी (पंढरपूर) यांना पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार; तसेच पाथर्डीच्या कौसल्याताई ढाकणे यांना विशेष समर्पित जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. गोरे म्हणाले, की स्त्रिया सर्वच पातळीवर स्वत:ला सिद्ध करतात. त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करतात. कोणत्याही संकटात त्या नम्रतेने जबाबदाऱ्या पूर्ण करतात. त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. डॉ. पाटील, डॉ. माधवी वैद्य, डॉ. कुकडे डॉ. बंडर्स, चंदाताई तिवाडी, डॉ. मूस, कौसल्याताई ढाकणे व डॉ. कराड यांची भाषणे झाली. डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Strength in women to face problems