स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा बँकेच्या शाखेसमोर ठिय्या आंदोलन

जगदीशचंद्र जोशी
सोमवार, 23 जुलै 2018

शिराढोण : खरीप हंगामातील पिकाचा विमा ऑफलाईन स्विकारावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 23) शिराढोण (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील जिल्हा बँकेच्या शाखेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शिराढोण : खरीप हंगामातील पिकाचा विमा ऑफलाईन स्विकारावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 23) शिराढोण (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील जिल्हा बँकेच्या शाखेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकविमा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ऑनलाईन पिकविमा भरावा लागत आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 24 जुलै अंतिम मुदत आहे तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. मात्र पिकविमा ऑनलाईन भरण्यासाठी असलेले संकेतस्थळ सुरळित चालत नाही. त्यामुळे ऑनलाईन पिकविमा भरताना अडचणी येत असून, अनेक शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेता पिकविमा ऑफलाईन भरून घ्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यानी जिल्हा बँकेच्या येथील शाखेसमोर सोमवारी ठिय्या मांडला.

शिराढोण शाखेअंतर्गत शिराढोणसह 13 गावांचा समावेश आहे. दरवर्षी या बँकेच्या शाखेत 12 ते 113 हजार कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी पिकविमा भरतात. ऑनलाईनची प्रक्रिया सुरळित नसल्यामुळे ऑफलाईन पिकविमा स्वीकारावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान तलाठी बाळहरी कलढोणे, कृषी सहायक मनोज पालकर यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला कळवला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विष्णूदास काळे, जिल्हा संघटक नामदेव माकोडे, कैलास पाटील, राजाभाऊ भिसे यांच्यासह शिराढोण व परिसरातील पिकविमा भरण्यासाठी आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: strike opposite to district bank by swabhimani shetkari sanghatana