विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना आजपासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील अभियांत्रिकी वगळता सर्व पदवी परीक्षांना गुरुवारी (ता.16) सुरवात होत आहे. या पदवी परीक्षांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे मिळून तीन लाख 18 हजार 445 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील अभियांत्रिकी वगळता सर्व पदवी परीक्षांना गुरुवारी (ता.16) सुरवात होत आहे. या पदवी परीक्षांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे मिळून तीन लाख 18 हजार 445 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील 246 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील बी.ए., बी.एस्सी, बी.कॉम, बी.बी.ए., बी.सी.ए., एल.एल.बी.सह इतर पदवी अभ्यासक्रमांच्या (अभियांत्रिकी वगळता सर्व पदवी अभ्यासक्रम) परीक्षांना गुरुवारपासून सुरवात होत आहे. पदवी परीक्षा 16 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान होणार आहेत. अपवादात्मक परिस्थिती असलेल्या ठिकाणीच यंदा होम सेंटरला मंजुरी देण्यात आली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या परीक्षा केंद्रांवर 1500 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे, अशा परीक्षा केंद्रांवर दोन सहायक परीक्षा केंद्रप्रमुख (जेसीएस) देण्यात आले आहेत. तर बी.एस्सीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार ऐच्छिक विषयाच्या दोन पेपरला 15 मिनिटांचा अधिकचा कालावधी परीक्षार्थींना देण्यात आला असल्याचेही डॉ. नेटके यांनी सांगितले.

पदव्युत्तरच्या तारखांमध्ये बदल
विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या पदव्युत्तर परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात येणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 24 मार्चपासून परीक्षांना सुरवात होणार होती. मात्र काही विषयांच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षा एकत्रित येत आहे. याचा अतिरिक्त ताण पदवीच्या प्राध्यापकांवर पडू नये आणि पदवीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक उपलब्ध होण्यासाठी पदव्युत्तरच्या परीक्षा आठ दिवस लांबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले. चार जिल्ह्यांत पदव्युत्तरची 95 परीक्षा केंद्रे असून, 66 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

अशा होतील परीक्षा
- पदवी परीक्षेस बसणारे विद्यार्थी : 3,18,445
- परीक्षा केंद्रे : औरंगाबाद - 107, जालना - 43, बीड - 60 , उस्मानाबाद - 17
- मूल्यांकन केंद्रे : 17
- दक्षता पथके ः 17
- पदव्युत्तर परीक्षेस बसणारे विद्यार्थी : 66,000
- पदव्युत्तर परीक्षा केंद्रे : 95

Web Title: student degree exam start