औरंगाबाद : तलावात पोहताना विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

वरूड काझी येथील पाझर तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. आकाश राजू लोखंडे (वय 19, रा. वरूड काझी) असे मृताचे नाव आहे. 

औरंगाबाद - वरूड काझी येथील पाझर तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. आकाश राजू लोखंडे (वय 19, रा. वरूड काझी) असे मृताचे नाव आहे. 

आपतगाव परिसरातील गजानन महाविद्यालयात आकाशने यावर्षी बी. फार्मसीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता. पोलिस अधिकारी होण्यासाठी त्याचा अभ्यास सुरू होता. शनिवारी गावात श्रावण महिन्यानिमित्त डोंगरावरील मारुतीच्या मंदिरात भंडारा होता. आकाश व इतर सर्व मित्र मंदिराच्या भंडाऱ्यात दुपारी प्रसादासाठी गेले होते.

प्रसाद घेतल्यानंतर गावच्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले. सुमारे पंधरा वीस जण तलावात होते; परंतु काही वेळाने आकाश दिसला नाही. तलावाच्या काठावर त्याचे कपडे दिसल्यावर मात्र तो तलावात खाली बुडाल्याचा संशय बळावला. स्थानिकांनी शोध घेतल्यावर तो तलावात आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. चिकलठाणा पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student dies in Lake