शिळा भात खाल्ल्याने 22 विद्यार्थ्यांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

वाळूज - शिळा भात खाल्ल्याने मदरशात शिकणाऱ्या 22 विद्यार्थ्यांसह एका स्वयंपाकीला विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) शेंदूरवादा (ता. गंगापूर) येथे घडली. चक्‍कर व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सर्वांना बिडकीन येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा जणांना अधिक त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.

वाळूज - शिळा भात खाल्ल्याने मदरशात शिकणाऱ्या 22 विद्यार्थ्यांसह एका स्वयंपाकीला विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) शेंदूरवादा (ता. गंगापूर) येथे घडली. चक्‍कर व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सर्वांना बिडकीन येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा जणांना अधिक त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.

शेंदूरवादा येथे 1983 पासून सुरू असलेल्या हजरत उबे बिन काब मदरशात जिल्हाभरातील 110 विद्यार्थी शिकतात. उर्दू माध्यमाचे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून, मुख्याध्यापक अस्लम खान यांच्यासह सात शिक्षक आहेत. रफिक शेख व त्यांची पत्नी येथे स्वयंपाकीचे काम करतात. या मदरशातील मुलांना सकाळी सातला चहा-रोटी, त्यानंतर सकाळी 11 वाजता व सायंकाळी पाच वाजता जेवण देण्यात येते. गुरुवारी (ता.13) सायंकाळच्या जेवणानंतर उरलेला भात शुक्रवारी (ता. 14) सकाळी काही मुलांनी व स्वयंपाकी रफिक शेख यांनी खाल्ला. त्यामुळे चक्कर व उलट्यांचा त्रास सुरू झाला. अहमद शेख यांनी सर्वांना बिडकीन येथील सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

शाहीद वाहेद पटेल (वय 11, रा. गाडीवाट, औरंगाबाद), सलमान अब्दुल कय्युम (13, रा. सलाबतपूर), जहीर जबीर शेख (9), समीर शकील शेख (11, दोघे रा. मिसारवाडी, औरंगाबाद), कय्यब अब्दुल कदीर (12, रा. रहीमपूर, ता. गंगापूर), मुजाहिद अस्लम अलीम (10, रा. बोडखा, ता.पैठण) यांच्यासह 22 जणांचा समावेश आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भात गुपचूप खाल्ल्याचा दावा
शुक्रवारी मदरशाला सुटी असल्यामुळे वर्ग होत नाहीत. त्यामुळे गुरुवारी जेवण मिळाल्यानंतर काही मुलांनी जास्तीचा भात घेऊन तो डब्यात, प्लास्टिकच्या पिशवीत घालून त्यांच्या लोखंडी पेटीत ठेवला होता. तोच सकाळी गुपचूप खाल्ल्यामुळे विषबाधा झाली, असा दावा मदरसा शिक्षक अब्दुल कदीर भिकन यांनी केला.

दवाखाना आहे, डॉक्‍टर नाही
विषबाधा झालेल्या मुलांना घेऊन शिक्षक अब्दुल कदीर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले; मात्र तेथे डॉक्‍टर नव्हते. सय्यद नावाच्या कंपाउंडरला फोन केला असता, आज सुटी असल्याने कुणीच नाही; तुम्ही सर्व मुलांना बिडकीन रुग्णालयात आणा, असे सांगण्यात आले.

सभापतींनी केली पाहणी
घटनेची माहिती मिळाल्याने गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती अविनाश गायकवाड यांनी भेट देऊन शिक्षक अब्दुल भिकन व विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली; तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरहजर डॉक्‍टरांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पोलिसांत घेतली धाव
वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह शशिकांत तायडे, सुरेश केले आदींनी मदरसा, तसेच बिडकीन येथील रुग्णालयात जाऊन मुलांची पाहणी केली. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी, परिसरातील नागरिकांनीही मदरशाकडे धाव घेत माहिती घेतली.

Web Title: student food poisioning in waluj