धोकादायक छताखाली विद्यार्थी गिरवतात ‘धडे’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

औरंगाबाद - महापालिकेच्या चार शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. सिडको एन-७ येथील शाळेतील सुमारे चारशे विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीमध्ये धडे गिरवावे लागत असल्याने या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच खोकडपुरा, कांचनवाडी, किराडपुरा येथील शाळांची तात्पुरती डागडुजी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

सिडको भागात असलेल्या शाळांच्या इमारती सुमारे ४५ वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींच्या छताचे प्लास्टर पडणे, गळती लागणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. गतवर्षी सिडकोत असाच प्रकार घडला होता. त्यामुळे अशा इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यंदाच्या शैक्षणिक सत्रापूर्वी अशा शाळांची दुरुस्ती होणे अपेक्षित होते.

मात्र, प्रशासकीय स्तरावरच उपाययोजनांचे प्रस्ताव सुरू आहेत. सिडको एन-सात येथील शाळेच्या मैदानात पत्र्याचे शेड मारून देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने वॉर्ड अभियंत्याला दिला आहे. त्याचबरोबर खोकडपुरा, कांचनवाडी, किराडपुरा (उर्दू) येथील शाळांची तात्पुरती डागडुजी करण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

शाळा                 विद्यार्थीसंख्या
सिडको एन-सात       ४०० 
किराडपुरा (उर्दू)        ३००
खोकडपुरा                ५५
कांचनवाडी              १७५

ऑडिटचा अहवाल गोलमाल
धोकादायक शाळा इमारतींचा स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल अद्याप महापालिकेने समोर आणलेला नाही. या संदर्भात विचारणा केली असता, त्यात गंभीर असे काहीच नाही, फार मोठा धोका नाही, असे सांगण्यात आले. 

सीएसआर फंडातून दहा खोल्या 
सिडको एन-सात येथील शाळेची इमारत फोर्ब्ज कंपनी सीएसआर (सामाजिक दायित्व निधी) फंडातून बांधून देणार आहे. पहिल्या वर्षी पाच त्यानंतर पाच अशा दोन वर्षांत या खोल्या बांधण्यात येणार आहेत.

Web Title: student school building dangerous