भिंतीवर सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शहरातील योगेश्वरीनगरी भागात बुधवारी (ता. सात) सायंकाळी बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘आयुष्यात मी चांगली व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला; पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो,’ असे त्याने भिंतीवर आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते.

अंबाजोगाई - शहरातील योगेश्वरीनगरी भागात बुधवारी (ता. सात) सायंकाळी बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘आयुष्यात मी चांगली व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला; पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो,’ असे त्याने भिंतीवर आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते. 

गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय १८) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील एका शाळेत शिक्षक आहेत. तो योगेश्वरी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. मागील काही दिवसांपासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जाऊन घरी परतला. दुपारच्या सुमारास त्याची आई तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात गेली होती तर वडील शाळेत होते. दुपारी चारच्या नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई-वडील घरी परतले; परंतु बऱ्याचदा आवाज देऊनही गुरुप्रसाद दरवाजा उघडत नव्हता. अखेर दरवाजा तोडल्यानंतर गुरुप्रसादने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. गुरुप्रसादचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Suicide