अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न भंगले, विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसाने शेतातील पिके उद्‌ध्वस्त झाली. वडिलांची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली. आर्मीत जायचे असल्याने सारिकाला क्‍लास लावायचा होता; परंतु आता पावसाने सर्व काही हिरावून नेल्याने सारिका नैराश्‍यात गेली आणि तिने टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपविली. 

बीड ः शेतातील उत्पन्न घटल्यामुळे वडिलांची आर्थिक परिस्थिती कमजोरी झाली. शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. दोन) घडली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु वेळेत उपचार न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. 

सारिका दादासाहेब शिंदे (वय 18, रा. कोळगाव, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. सारिका गेवराई तालुक्‍यातील चकलांबा येथील महाविद्यालयात बारावी सायन्सचे शिक्षण घेत होती. सैन्य दलात अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. यासाठी तिला नगर येथील आर्मी महाविद्यालयात क्‍लासेस लावायचे होते; परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे वडिलांची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली. यामुळे शिक्षणासाठी पैसा अपुरा पडू लागला. याच नैराश्‍यातून सारिकाने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवली. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून मुलांचे शिक्षण, लग्न यासह इतर समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या राहिल्या आहेत. 

दरम्यान, सारिका शिंदेने विषारी औषध घेतल्यानंतर तिला उपचारासाठी सुरवातीला गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तब्येत नाजूक असल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, तेथून सारिकाला नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली नाही. यामुळे सारिकाला एका खासगी वाहतातून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर या ठिकाणी एकही डॉक्‍टर हजर नसल्यामुळे सारिकावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. यामुळेच सारिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student suicide