पठ्ठ्यानं पवारांना बॉण्ड पेपरवर लिहून दिलं, 'कधीच पक्ष सोडणार नाही!'

जगदीश पानसरे
रविवार, 22 सप्टेंबर 2019

विद्यार्थ्याने शपथ पत्र का लिहून दिले याचे कुतूहल सगळ्यांनाच होते. शरद पवारांनी जेव्हा त्या शपथ पत्रातील मजकूर वाचला. तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि त्याचे कौतुक केले.

औरंगाबाद : माजी मंत्री, दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी दादाराव कांबळे याने शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर शरद पवार यांना शेवटच्या श्‍वासापर्यंत राष्ट्रवादी सोबतच राहणार, कधीच पक्ष सोडणार नाही, हे लेखी लिहून दिले. विद्यार्थ्यांचे हे आपल्या प्रती असलेले प्रेम पाहून शरद पवारांनी त्याचे कौतुक केले. 

'मी काय म्हातारा झालो का?' अशा शब्दांत कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून शरद पवारांनी तरुणाईला घातलेली साद सगळ्यांनाच भावली आणि 'साहेब, आम्ही तुमच्या सोबतच आहोत,' अशी ग्वाही मराठवाड्यातील युवकांनी पवारांना दिली. शुक्रवारी (ता.20) शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडल्यानंतर ते मुक्कामी राहिले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हॉटेलात गर्दी केली होती, पण सुरक्षेच्या कारणामुळे भेट होऊ शकली नव्हती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी शरद पवारांना भेटण्याची तीव्र इच्छा पूर्ण करण्याचा आग्रह धरला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. उल्हास उढाण यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या भावना सांगितल्या. त्यानंतर पवारांनी परवानगी देत हॉटेलच्या मीटिंग हॉलमध्ये विद्यार्थ्यांना भेटण्याची व्यवस्था करण्याची सूचना संबंधितांना केली. 

बॉण्डवर लिहून दिलं, 'कधीच पक्ष सोडणार नाही!'
विद्यार्थ्याने शपथ पत्र का लिहून दिले याचे कुतूहल सगळ्यांनाच होते. शरद पवारांनी जेव्हा त्या शपथ पत्रातील मजकूर वाचला. तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि त्याचे कौतुक केले.

No photo description available.

या विद्यार्थ्याने या शपथ पत्रात नमूद केले की, "मी एक संशोधक विद्यार्थी व आपला कार्यकर्ता आहे, आपल्या विचारांची बांधिलकी जोपासणारा, आपल्या पक्षाची भूमिका अगदी चहाच्या टपरीपासून विद्यापीठातील मेसवर येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर माझ्या बोली भाषेतून मांडत असतो. आपल्या सामाजिक आणि वैचारिक विचाराने झपाटलेला मी सामान्य घरातील विद्यार्थी आहे.'' 

'सध्याच्या काळात पक्षाची होत असलेली वाताहत पाहून माझे मन खिन्न झाले आहे. साहेब कोणी नेते, मंत्री कुठेही गेले असले, तरी मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्या पुरोगामी विचारांचा वसा सांभाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन आणि उभ्या आयुष्यात कधीच पक्ष सोडणार नाही, असा मनोदय त्याने यावेळी व्यक्त केला.

- Vidhan Sabha 2019 : हात वर करुन मतदान करण्याची पद्धत आणली तरीही चालेल- पाटील

- काश्‍मिरी नेत्यांसाठी आम्ही पुरवितो हॉलिवूडच्या सीडी : जितेंद्रसिंह ​

- ‘हे बरं नव्हं’; साताऱ्यात पवारांचा उदयनराजेंना टोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A student wrote on bond paper that he never leaving NCP