विद्यार्थी मागणार सामुदायिकरीत्या 'टीसी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

औरंगाबाद - शासकीय कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अधिव्याख्यात्यांच्या शिकविण्याच्या पद्धती आणि अनुभवावरून कला संचालकांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. 10) सामुदायिकरीत्या महाविद्यालय सोडल्याचा दाखला (टीसी) मागण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता. 11) अधिष्ठातांना भेटून ही मागणी करणार असल्याचे एका विद्यार्थ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'ला सांगितले.

महाविद्यालयातील पाच अधिव्याख्यात्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी कला संचालकांकडे तक्रार केली होती. त्यात महाविद्यालयाला भेट द्यावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार कला संचालक राजीव मिश्रा यांनी अडीच महिन्यांपूर्वी महाविद्यालयास भेट देऊन चौकशी समिती नेमली होती. डॉ. मनीषा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानुसार पाच अधिव्याख्यात्यांना कारणे दाखवा नोटीस दिली; मात्र अधिव्याख्यात्यांनी ते आरोप नाकारले आहेत.

कला संचालकांनी अधिष्ठाता भरत गडरी यांना पाठविलेल्या पत्रात अधिव्याख्यात्यांना सक्‍त ताकीद देण्यात यावी, तसेच अध्यापनामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा होईल, यादृष्टीने अधिष्ठाता म्हणून लक्ष घालावे. यानंतर विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास अधिव्याख्यात्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी अधिष्ठाता स्तरावर समज देण्यात यावी. कार्यवाहीनंतरही विद्यार्थ्यांनी अडथळे आणले तर संबंधितांविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात यावी, असा स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. यावर विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कला संचालकाच्या निर्णयाबाबत आम्ही समाधानी नाही. त्यामुळे आम्हाला टीसी देण्यात यावी, असा अर्ज महाविद्यालयाच्या कला शाखेचे विद्यार्थी बुधवारी (ता. 11) करणार आहेत. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रात, महाविद्यालयातील शिक्षणपद्धती कधी कळलीच नाही, असेच शिक्षण मिळणार असेल तर महाविद्यालयात न शिकलेलेच बरे, असाही उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: Students ask community 'TC'