खाऊच्या डब्यातील पैसे पूरग्रस्तांना 

तुषार पाटील
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

भोकरदन (जि. जालना) - टीव्ही, वृत्तपत्रांतून महापुराचे रौद्ररूप, आबालवृद्धांचे हाल पाहिलेल्या दोन शाळकरी बहीण-भावाने खाऊच्या पैशांतून केलेली वर्षभराची बचत रविवारी (ता. 11) पूरग्रस्तांसाठी देऊ केली. विशेष म्हणजे हा निर्णय या दोघांचा होता.

भोकरदन (जि. जालना) - टीव्ही, वृत्तपत्रांतून महापुराचे रौद्ररूप, आबालवृद्धांचे हाल पाहिलेल्या दोन शाळकरी बहीण-भावाने खाऊच्या पैशांतून केलेली वर्षभराची बचत रविवारी (ता. 11) पूरग्रस्तांसाठी देऊ केली. विशेष म्हणजे हा निर्णय या दोघांचा होता.

भोकरदन येथील गणपती विद्यालयातील सातवी इयत्तेतील श्रेया रमेश सुसर आणि तिसरी इयत्तेतील श्रेयस या बहीण-भावंडानी वर्षभरापासून खाऊच्या पैशांतून बचत केली. लवकरच वडील रमेश यांचा वाढदिवसही आहे. त्यामुळे या पैशांतून वडिलांना छानसे गिफ्ट द्यावे, असा त्यांचा विचार. काही दिवसांपूर्वी वडिलांचा छोटासा अपघात झाला, त्यात त्यांचा पायही फ्रॅक्‍चर झाल्याने मुलेही थोडीशी हळवी झालेली होती. त्यातच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराच्या बातम्यांनी ही भावंडं व्यथित झाली. शिवाय ठिकठिकाणांहून पूरग्रस्तांना मदतीचा ओघही सुरू झालेला. त्यामुळे पूरग्रस्त लहान मुलांना आपणही मदत करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. वडिलांना गिफ्ट देण्याचा निर्णय बदलत पूरग्रस्तांना मदत करण्याचे श्रेयस व श्रेयाने ठरविले. ही बाब त्यांनी वडिलांना सांगितली. रमेश यांनी केवळ होकारच नव्हे, तर आपलेही एक हजार रुपये या मुलांच्या स्वाधीन केले. श्रेयस आणि श्रेयाने आपापला बचतीचा डबा उघडून पैसे मोजले, तेव्हा ते 1 हजार 997 रुपये इतके भरले. 

दोन्ही भावंडांनी हा बचतीचा पैसा शहरात मदतीचे संकलन करणाऱ्या सुनील जाधव, सोपान सपकाळ, सुनील झंवर यांच्याकडे सुपूर्द केला. चिमुकल्यांचे हे दातृत्व पालकांसह परिसरातील नागरिकांच्या हृदयाला स्पर्श करून गेले. 

टीव्हीवर पावसात भिजणारे आमच्यासारखी भावंडं पाहून वाईट वाटले. ते आता रक्षाबंधन कसे साजरे करतील, त्यांचे दप्तर, पुस्तके भिजली असतील. इतरांप्रमाणे आपणही त्यांना मदत केली पाहिजे, असे वाटले. 
श्रेया सुसर, 
विद्यार्थिनी, भोकरदन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students donate saved money to flood affected peoples