
सरकारच्या आदेशानंतर लातूर जिल्ह्यात शाळा सुरू करून पाच दिवस झाले तरी अनेक विद्यार्थी शाळेत पाऊल ठेवायला तयार नाहीत. पालकांनीच ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती अजून वाढलेली नाही.
लातूर : सरकारच्या आदेशानंतर जिल्ह्यात शाळा सुरू करून पाच दिवस झाले तरी अनेक विद्यार्थी शाळेत पाऊल ठेवायला तयार नाहीत. पालकांनीच ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती अजून वाढलेली नाही. पूर्वीपासून ऑनलाइन वर्गात सहभागी असलेले बहुतांश विद्यार्थी सध्या शाळेत हजेरी लावताना दिसत आहेत. ऑनलाइनमध्ये सहभागी नसलेल्या विद्यार्थ्यांनी अजून शाळेत पाऊल ठेवले नसल्याने ते अजूनही ‘ऑफलाइन’च असल्याचे चित्र आहे. यातूनच मंगळवारपासून (ता. एक) सर्व वर्ग एकाच दिवशी भरवण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी दिली.
कोरोनाचा प्रभाव कमी झालेल्या भागात सरकारने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून शाळांची दारे उघडली. पहिल्या दिवशी साडेबारा टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती. पाचव्या दिवशी शुक्रवारी (२७) ही हजेरी १९ टक्क्यापर्यंत पोचली आहे. ९४ टक्के शाळांचे कामकाजही सुरू झाले आहे. पालक अजूनही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत नसल्याचे चित्र आहे. यासोबत शहरांतील शाळांनी एक दिवस नववी व दुसऱ्या दिवशी दहावी तर एक दिवस अकरावी व दुसऱ्या दिवशी बारावी असे एक दिवसाआड वर्ग सुरू केल्यामुळेही विद्यार्थ्यांच्या हजेरीचा टक्का कमी दिसत आहे.
मंगळवारपासून सर्व वर्ग एकाच दिवशी सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर विद्यार्थ्यांची हजेरी वाढण्याची आशा श्री. उकिरडे यांनी व्यक्त केली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर ऑनलाइन शिक्षणामध्ये सहभागी असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावल्याचे दिसत आहे. ऑनलाइनमध्ये सहभागी नसलेले विद्यार्थ्यांनी शाळेतही हजेरी लावली नसल्याची बाब प्रकर्षाने पुढे येत आहे. हे विद्यार्थी शाळेत व घरीही नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न पुढील काळात होणार आहे. ऑनलाइनची साधने नसलेले अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांनी आता तातडीने शाळेत येऊन त्यांना राहिलेल्या अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी पुढे यावे तसेच पालकांनीही आपला पाल्य शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊन शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. उकिरडे यांनी केले आहे.
शिक्षणाचे महिन्याचे नियोजन
बहुतांश शाळांनी ऑनलाइन उपक्रमांतून ७० ते ८० टक्के अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला आहे. राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासह विविध विषयाच्या कठीण घटकांची उजळणी करून घेण्यासाठी शाळांना महिन्याचे वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या तरी दोन डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीचे वेळापत्रक तयार करण्यात येत असून, त्यात उन्हाळी वर्गाच्या धर्तीवर विविध विषयाच्या अध्यापनाचे नियोजन करण्यात येत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी उकिरडे यांनी सांगितले.
Edited - Ganesh Pitekar