शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थी फिरवताहेत पाठ

प्रशांत शेटे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. 

चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. 

राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना राज्यात वर्ष 1954 पासून सुरू केली आहे. पूर्व माध्यमिक परीक्षा चौथीच्या वर्गासाठी व माध्यमिक परीक्षा सातवीच्या वर्गासाठी घेतली जात होती; परंतु यामध्ये सुधारणा करून वर्ष 2017 पासून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी ही परीक्षा ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही वर्ग माध्यमिक शाळांना संलग्न असून या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना परीक्षेच्या माहितीचा अभाव असल्यामुळे विद्यार्थी संख्येत निम्म्याने घट झालेली आहे.

राज्यातील लातूर, ठाणे, पालघर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या "सेस' फंडातून व मुंबई, उल्हासनगर, पुणे; तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निधीतून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचा निर्णय झालेला असतानाही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग दिसत नाही. यावर्षीची परीक्षा 16 फेब्रुवारी रोजी होणार असून, यासाठी एक ऑक्‍टोबरपासून परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यास सुरवात झाली आहे.

या परीक्षेसाठी जास्तीतजास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी शिक्षण संचालकातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा व तालुकास्तरावर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची कार्यशाळा घेण्यासह जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण कसे होतील यासाठी शाळा स्तरावरून विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करणे, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका बालभारतीच्या छापील किमतीवर पंधरा टक्के सवलत देणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ॉ

परीक्षेसाठी विद्यार्थीसंख्या वाढावी यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्यातरी शिक्षक यास किती प्रतिसाद देतात यावर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे भवितव्य अवलंबून आहे. 

 

संख्येत घट
वर्ष 2015 ला राज्यातून 15 लाख 94 हजार 289 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 
वर्ष 2019 ला आठ लाख 66 हजार 131 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तसेच लातूरमध्ये विद्यार्थीसंख्येत घट झाली आहे. गेल्यावर्षी पाचवीच्या वर्गातील 49 हजार 827 विद्यार्थ्यांपैकी फक्त 18 हजार 408 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर आठवीच्या वर्गातील 52 हजार 137 विद्यार्थ्यांपैकी 11 हजार 687 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students' response lower down towards scholarship exam