विद्यार्थ्यांसाठी पुन्हा रविवार झाला आवडीचा

विकास गाढवे
सोमवार, 9 जुलै 2018

लातूर - तुम्ही विद्यार्थी दशेत असताना रविवारी काय करत होता, असा प्रश्न जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मुरूड (ता. लातूर) येथील खासगी शिकवणी (ट्युशन) घेणाऱ्या शिक्षकांना विचारला. त्यानंतर या शिक्षकांनी त्यांच्याकडील रविवारच्या शिकवणीला सुट्टी दिली. गावातील बहुतांश ट्युशनचालकांनी त्यांचे अनुकरण केले. यामुळे रविवारी (ता. आठ) विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच खऱ्या सुट्टीचा आणि `संडे के दिन फंडे`चा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांसाठी काही वर्षापासून नावडीचा झालेला रविवार पुन्हा आवडीचा झाला.

लातूर - तुम्ही विद्यार्थी दशेत असताना रविवारी काय करत होता, असा प्रश्न जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मुरूड (ता. लातूर) येथील खासगी शिकवणी (ट्युशन) घेणाऱ्या शिक्षकांना विचारला. त्यानंतर या शिक्षकांनी त्यांच्याकडील रविवारच्या शिकवणीला सुट्टी दिली. गावातील बहुतांश ट्युशनचालकांनी त्यांचे अनुकरण केले. यामुळे रविवारी (ता. आठ) विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच खऱ्या सुट्टीचा आणि `संडे के दिन फंडे`चा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांसाठी काही वर्षापासून नावडीचा झालेला रविवार पुन्हा आवडीचा झाला.

सध्या शिक्षणाच्या बाबतीत पालक मुलांची खूप काळजी वाहताना दिसत आहेत. पालकांच्या या मानसकितेमुळेच खासगी शिकवणींना (कोंचीग क्लासेस) महत्व आले आहे. गुणांची स्पर्धा वाढल्याने पूर्वी केवळ शाळेतच शिक्षण घेतलेले पालक पाल्यांना विविध विषयासाठी बाहेर शिकवणी लावण्यासाठी धावपळ करत आहे. यामुळे पूर्वी शाळेच्या दिवशीच असलेले शिकवणीचे वर्ग आता रविवारीही सुरू झाले. आठवड्यातील अन्य दिवशी शिकवणी आणि रविवारच्या दिवशी परीक्षा घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनातून रविवारची सुट्टी निघून गेली. एकानंतर एक शिकवण्या असल्याने त्यातच रविवार जात आहे. चांगले गुण घेण्यासाठी नियमित अभ्यासासोबत शिकवणीही आवश्यक बनून गेली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाशिवाय खेळ, अवांत्तर वाचन आणि आवडीचे छंद जोपासणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही. शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांची जीव टांगणीला लागला आहे. खासगी शिवकणीप्रमाणे काही विद्यालय व महाविद्यालयांनीही रविवारी स्वतंत्र वर्ग घेण्यास सुरूवात केली. रविवारच्या सु्ट्टीच्या दिवशी तर विद्यार्थ्यांना अडकून ठेवण्याची स्पर्धाच लागली. जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी जिल्ह्यातील शिक्षणाचे हे सात दिवस चोवीस तास अभ्यासाचे समीकरण भावलेले नाही. यातूनच त्यांनी रविवारी किमान एक दिवस तरी विद्यार्थ्यांना मोकळीक म्हणजे खरेच  सुट्टी मिळायला हवी, असा आग्रह धरला आहे. मागील आठवड्यात एका कार्यक्रमानिमित्त मुरूड (ता. लातूर) येथे गेल्यानंतर त्यांनी शिकवणीला जात असलेल्या अंजली शिंदे या विद्यार्थीनीशी संवाद साधला आणि तिला रविवारच्या शिकवणीवर चर्चा केली. तिनेही एक दिवस सुट्टी मिळालयाच हवी, अशी प्रांजळ भावना व्यक्त केली. त्यानंतर अंजलीची शिकवणी घेणारे शिक्षक संतोष पिसाळ यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तुम्ही विद्यार्थी असताना रविवारी काय करत होतो, असा थेट प्रश्न त्यांनी पिसाळ यांना विचारला. प्रश्नातील मर्म ओळखून पिसाळ यांनी त्यांच्या शिकवणीला दर रविवारी सुट्टी जाहिर करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. दोघांतील संवाद विद्यार्थ्यांमार्फत गावभर पसरला आणि रविवारी गावातील बहुतांश शिकवणी वर्ग बंद राहिले. यामुळे अनेक वर्षानंतर मुरूडच्या विद्यार्थ्यांनी रविवारी खऱ्या सुट्टीचा आनंद घेतला.  

लातुरातही रविवारी सुट्टी   
लातूरमध्ये पॅटर्नच्या नावाखाली रविवारी शिकवणी व अन्य वर्ग सुरू आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना श्वास घेण्यासही फुरसत नसल्याचे चित्र आहे. दिवसभर ते महाविद्यालयातील वर्ग व शिकवणीच्या वर्गात गुंतून पडत आहेत. विद्यार्थी यंत्रासारखे होऊन त्यांच्या जीवनातून सुट्टी पळून गेली असून आठवड्यातील सर्वच दिवस सारखे झाले आहेत. यामुळे लातुरमध्येही विद्यार्थ्यांच्या जीवनातील रविवारची सुट्टी परत आणण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत प्रयत्न करणार आहेत. सुट्टी आणि अन्य विषयावर ते लवकरच कोचिंग क्लासेसचालकांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

Web Title: students will Sunday as a holiday