स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी मूळ संदर्भग्रंथच वाचा : कृष्णा भोगे

संकेत कुलकर्णी
शनिवार, 23 जून 2018

सर्व प्रश्न सोडवताना अगोदर ते गणित पक्के झाले पाहिजे. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी उत्तरे बरोबर येत असतील, तरच चान्स घ्या. पण पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत तुमचा स्कोअर असेल, तर चान्स घेऊ नका. त्यापेक्षा जास्त असतील, तर हमखास चान्स घेतला पाहिजे, असे कृष्णा भोगे म्हणाले.

औरंगाबाद : बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही यशाचे हमखास मंत्र देणाऱ्या तथाकथित पुस्तकांपेक्षा मूळ संदर्भग्रंथ वाचा, असा सल्ला निवृत्त प्रशासकीय अधिकारी कृष्णा भोगे यांनी दिला. राज्यघटना वाचा, शासनाचे अहवाल, वेगवेगळे रिपोर्ट, अर्थशास्त्र आणि इतर विषयांची मूळ पुस्तके वाचा, असेही ते म्हणाले.

'सकाळ माध्यम समूह' आणि 'भोगे करिअर अॅकॅडमी' यांच्या संयुक्त विद्यमाने एमपीएससी-यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर शनिवारी (ता. 23) आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, 'सकाळ'च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड आणि यूपीएससीच्या 2017च्या परीक्षेत देशात 131 वा रँक मिळवणारी वल्लरी गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरवातीला वल्लरी यांनी स्वानुभवातून अभ्यासाच्या तंत्राचे आणि आपल्या यशाचे गमक उलगडून सांगितले. डॉ. निपूण विनायक यांनी प्रत्येकाला कागदावर प्रश्न लिहायला लावून त्यावर उपस्थितांमध्ये चर्चा घडवून आणली. 

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्ली-पुण्याला जायची गरज नाही

एमपीएससी-यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज आता उरलेली नाही. तंत्रज्ञान एवढे पुढे गेले, की आपल्या शहरातही तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. फक्त आवडीचे विषय काळजीपूर्वक निवडा, त्याचा सखोल अभ्यास करा. शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तरे लिहा. तुमच्या उत्तरांमध्ये वेगळेपण असले पाहिजे, असे वल्लरी गायकवाड म्हणाल्या.

विद्यार्थ्यांबरोबर ही पालकांचीही परीक्षा असते. अनेक चढउतार विद्यार्थ्यांना अनुभवावे लागतात. कधी-कधी नैराश्य येते. मात्र यावेळी पालकांचेही पाठबळ फार महत्वाचे ठरते. माझ्या यशाचे सूत्र समतोल हे आहे. शारीरिक, मानसिक संतुलन साधल्यामुळे सर्व काही शक्य होते. एखादा छंद जोपासला पाहिजे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परिक्षेसाठी फार एकाग्रतेने आणि नेमक्या अभ्यासावर भर दिला पाहिजे. करायचाच असेल तर पूर्ण समर्पण असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आधी ठरवा, तरच होईल

मला आयएएस व्हायचेय हे आधी ठरवा. मग त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं मी करीलच, असे म्हणा. ही तुमची एकट्याची लढाई आहे. त्यात टिकलात तर जिंकालच. काय वाचायचं, किती वाचायचं, किती वेळ द्यायचा, हे कुणी दुसऱ्याने सांगून उपयोग नाही. तुमचे तुम्हाला ठरवावे लागेल.

सर्व बंधने स्वतःची आहेत. त्यातून सकारात्मक विचार करा. कम्फर्ट झोनमधून बाहेर या. आयएएस म्हणजे व्यवस्था सुधारण्याची संधी. देश घडवणयात आपण काहीतरी हातभार लावतोय, याच समाधान मिळेल. आयएएस होण्यासाठी फार हुशार असावेच लागते हा गैरसमज काढून टाका. सर्वसामान्य बुद्धिमत्तेची मुलेच यात पास होतात. फक्त तात्कालिक मनोरंजनाच्या साधनांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे, असे निपूण विनायक म्हणाले.

मनाने जिंकलेली माणसंच प्रत्यक्षात जिंकतात

मराठवाड्यातल्या माणसाला जिद्द शिकवायची गरज नाही. त्यांच्यात ती उपजत आहेच. जगात नाकारणारी व्यवस्था खूप आहे. स्वीकारणारी व्यवस्था दुर्मिळ आहे. गरज आहे ती फक्त यश आणि अपयशाची व्याख्या बदलण्याची. अपयशी झालेल्यांचा अभ्यास करा. प्रयत्नवादी राहा.

प्रत्येक माणूस जन्माला येतो, तेव्हाच त्याच्यात उपजत सकारात्मक गोष्टी गुण असतातच. त्या आपल्यातील क्वालिटीवर मेहनत घ्या. मला काय करायचं आहे ते मी ठरवलं पाहिजे. माणसं आधी मनाने जिंकलेली असतात. नंतरच ती प्रत्यक्षात जिंकतात. आपला स्पेस आपल्याला शोधता आला पाहिजे, असे मार्गदर्शन संजय वरकड यांनी केले. 

समस्या नेमकी ओळखली, तर स्पर्धेची काळजी करू नका 

बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही यशाचे हमखास मंत्र देणाऱ्या तथाकथित पुस्तकांपेक्षा मूळ संदर्भग्रंथ वाचा, राज्यघटना वाचा, शासनाचे अहवाल, वेगवेगळे रिपोर्ट, अर्थशास्त्र आणि इतर विषयांची मूळ पुस्तके वाचा. पुस्तकांचे व्यापारीकरण रोखण्यासाठी यूपीएससीने अलिखित निर्णय घेतलाय, की त्याच्यातील प्रश्न घ्यायचीच नाहीत.

सर्व प्रश्न सोडवताना अगोदर ते गणित पक्के झाले पाहिजे. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी उत्तरे बरोबर येत असतील, तरच चान्स घ्या. पण पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत तुमचा स्कोअर असेल, तर चान्स घेऊ नका. त्यापेक्षा जास्त असतील, तर हमखास चान्स घेतला पाहिजे, असे कृष्णा भोगे म्हणाले.

एखादा विषय गुण मिळवण्यासाठी पूरक ठरतो. मग मात्र त्यामागेच झुंबड उडते. पर्यायी विषय निवडताना फार काळजी घ्यावी लागते. त्यात 55 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले, तरच स्पर्धेत राहता येते. त्यामुळे जो विषय आवडतो, तोच घ्या. 
एमपीएससी कठीण आणि यूपीएससी सोपी, हा गैरसमज काढून टाका. तीन महिने अभ्यास केला, तर उत्तरे देता येतील, असा विश्वास वाटला तीच परीक्षा निवडा. 

समस्या नेमकी ओळखली, तर स्पर्धेची काळजी करू नका. किती अभ्यास करता यावरच तुमचे यश अवलंबून आहे. निराश होऊ नका. जिद्द सोडू नका. संयम आणि पाठपुरावा हे दोन मंत्र लक्षात ठेवा, असे कृष्णा भोगे म्हणाले.

Web Title: For the study of competitive exams read the original references says Krishna Bhoge