तांडा ते फिनलॅन्ड शिक्षकाचा अभ्यास दौरा

सुहास सदाव्रते
सोमवार, 15 मे 2017

आधुनिक शिक्षणासाठी विविध देशांतील शिक्षणप्रणालीचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. तांड्यावरच्या शाळेतील शिक्षक धुमाळ यांनी फिनलॅन्ड देशाचा दौरा करून वेगळा अनुभव घेतला. याचा उपयोग ते नक्‍कीच शाळेच्या विकासासाठी करतील.
-बाळासाहेब खरात, गटशिक्षणाधिकारी, जालना

जालना - देशातील शिक्षण पद्धती आणि विदेशांतील कृतियुक्‍त शिक्षण पद्धती याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तांड्यावरचे तुकाराम धुमाळ गुरुजी थेट फिनलॅन्ड देशात गेले. तीन दिवसांचा अभ्यास करून शैक्षणिक पद्धतीतील विसंगत बाबींचा अभ्यास त्यांनी केला. तेथील शिक्षणप्रणालीचा वापर आपल्या देशात व्हावा तरच प्राथमिक शिक्षणात बदल होईल, असा विचार त्यांनी मांडला.

राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध देशांतील शिक्षणप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षकांची निवड केली जाते. यंदाच्या फिनलॅन्ड देशातील शाळांचा अभ्यास दौरा करण्यासाठी जालना तालुक्‍यातील पवार तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तुकाराम धुमाळ यांची निवड करण्यात आली होती. शिक्षक धुमाळ यांनी नुकताच 8 ते 10 मे दरम्यान तीन दिवसांचा अभ्यास दौरा पूर्ण केला. फिनलॅन्ड देशातील टाम्पेरे शहरातील स्टेन स्कूल, इलेटा, हरेव्हटा व व्हॉकेरॉल या शाळांना त्यांनी भेटी दिल्या. येथील शाळा या सरकारी शाळा असून येथे एकही खासगी संस्थेची शाळा नाही. तसेच या शाळांमधून स्वीडीश भाषेत शिक्षण दिल्या जाते, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांच येथे नसल्याचे श्री. धुमाळ यांनी सांगितले.

कृतियुक्‍त वर्ग अध्यापनातून विविध संज्ञा आणि संकल्पना स्पष्ट करून सांगण्याची तेथील पद्धतही अनोखीच आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना त्यांच्या कलाने अभ्यास करून घेण्याची येथील शाळांची पद्धतही अभिनव असल्याचे श्री. धुमाळ यांनी सांगितले. या देशात बाराही महिने शाळा चालतात. आपल्याकडे जसे विविध सणा- वारांच्या सुट्या असतात तशा या देशात शाळांना सुट्या नसतात हे वेगळेपण दोन देशातील शिक्षण प्रणालीत प्रामुख्याने आढळून आल्याचे श्री. धुमाळ सांगतात.

आधुनिक शिक्षणासाठी विविध देशांतील शिक्षणप्रणालीचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. तांड्यावरच्या शाळेतील शिक्षक धुमाळ यांनी फिनलॅन्ड देशाचा दौरा करून वेगळा अनुभव घेतला. याचा उपयोग ते नक्‍कीच शाळेच्या विकासासाठी करतील.
-बाळासाहेब खरात, गटशिक्षणाधिकारी, जालना

Web Title: A study tour takes a teacher to Finland