अनुदानापोटी शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

गेवराई / माजलगाव (जि. बीड)  - गेल्या हंगामात नोंदणी केलेल्या; पण खरेदी न झालेल्या तुरीपोटी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. बहुप्रतीक्षेनंतर आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. त्यावेळीही ‘हातावर तुरी’ची अनुभूती काही शेतकऱ्यांना आली आहे. अनुदानापोटी काहींच्या खात्यात चक्क एक रुपया जमा झाला आहे. खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आणखी काही दिवस चालेल. त्यामुळे असे प्रकार वाढण्याची चिन्हे आहेत.

नाफेडमार्फत गेल्या वर्षी जिल्ह्यात १४ केंद्रांवरून ५४५० रुपये प्रतिक्विंटल या हमी भावाने तुरीची खरेदी झाली. ठरलेल्या मुदतीत जिल्ह्यात दोन लाख २१ हजार क्विंटल तूर खरेदी झाली. नाफेडची खरेदी यंत्रणा सक्षम नसल्याने साधारण एक लाख क्विंटल तूर खरेदी करता आली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात पुढे केला. नोंदणी केलेल्या परंतु खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने मागील अधिवेशनात केली. त्यानुसार जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून अशा शेतकऱ्यांची माहिती मागवून घेण्यात आली. त्यानंतर अनुदान वाटपाचा तिढा अद्याप कायमच होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १२) येथील दौऱ्यात अनुदान वर्ग केल्याचे सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पडू लागली. खात्यावरील रक्कम पाहून काही शेतकरी चक्रावले. वाघोरा (ता. माजलगाव) येथील महादेव बादाडे यांची सात क्विंटल तूर होती. त्यांच्या खात्यावर एक रुपया अनुदान जमा झाले आहे. ऊर्मिला मुकुंद बादाडे यांनाही तेवढ्याच तुरीसाठी तीन रुपये ७५ पैसे, तर निपाणी जवळका (ता. गेवराई) येथील श्रीकिसन लोणकर या शेतकऱ्याला दहा क्विंटल तुरीसाठी चक्क एक रुपया अनुदान मिळाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या हंगामात खरेदी केलेल्या तुरीचे एक कोटी २२ लाख रुपयांचे चुकारे अद्यापही शासनाकडे बाकी असताना अनुदानापोटी मिळालेली रक्कम म्हणजे चेष्टाच असल्याची भावना संबंधित शेतकरी व्यक्त करीत आहेत.

परत नेण्याचे फर्मान!
बीड आणि गेवराई या दोन केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी न झालेली साधारण अडीच हजार क्विंटल तूर खरेदी झाली. मापे झाल्यानंतर दोन महिन्यांनी ही तूर शेतकऱ्यांनी परत न्यावी, असे पत्र पणन विभागाने काढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com