जिद्दीच्या बळावर भरारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 June 2018

वडिलांमुळेच आजचा दिवस; लालमातीने खूप दिले
बीड - जीवनातील कठीण परस्थितीशी दोन हात करीत राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकावले. माझे लक्ष आता एशियन स्पर्धेकडे असून, वडिलांमुळेच मला आजचे यश पाहायला मिळत आहे. या लालमातीने मला खूप काही दिले आहे, असे मत कुस्तीपटू राहुल आवारे याने पत्रकार परिषदेत रविवारी (ता. तीन) व्यक्त केले. 

वडिलांमुळेच आजचा दिवस; लालमातीने खूप दिले
बीड - जीवनातील कठीण परस्थितीशी दोन हात करीत राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकावले. माझे लक्ष आता एशियन स्पर्धेकडे असून, वडिलांमुळेच मला आजचे यश पाहायला मिळत आहे. या लालमातीने मला खूप काही दिले आहे, असे मत कुस्तीपटू राहुल आवारे याने पत्रकार परिषदेत रविवारी (ता. तीन) व्यक्त केले. 

राहुल म्हणाला, की पाटोदा तालुक्‍यातील एका छोट्या गावात राहून खूप कठीण परस्थितीतून प्रवास केला आहे. खेडेगावात कुस्ती खेळून परस्थितीशी दोनहात केले. जीवनात काही तरी करण्याची इच्छा असेल तर ते यश नक्कीच मिळते. जिद्दीच्या बळावरच आजचा विजय मिळविला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या योजना अपुऱ्या पडत आहेत. या वेळी गोकूळ आवारे, शौकतभाई फौजी, बाळासाहेब आवारे, बालाजी तोंडे उपस्थित होते.

राहुल आवारे लवकरच पोलिस उपअधीक्षक
सुवर्णपदक विजेता राहुल आवारे याने सुवर्णपदक मिळविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय सेवेत घेण्यात येणार असल्याने आश्वासन दिले होते. त्यासाठी लागणारे कागदपत्रे दिली असून लवकरच राहुल आवारेला प्रशासकीय सेवेत घेण्यात येणार आहे. त्याचे पोलिस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

ऑगस्टमधील एशियन स्पर्धेसाठी तयार
राहुल आवारेने सुवर्णपदक मिळविल्यानंतर त्यांचे सर्वांनी कौतुक केले. राहुलने आता ऑगस्टमध्ये होणाऱ्या एशियन स्पर्धेची तयारी केली असून दोनच दिवसांत एशियन स्पर्धेसाठी कुणाची निवड होणार, हे स्पष्ट होणार आहे.

माजी सैनिकाच्या मुलाची ‘गरूड’झेप!
आष्टी - आष्टी शहरातील मुर्शदपूर येथील रहिवासी मनोज मंगेश जोशी याची भारतीय वायुदलात ‘गरूड कमांडो’ म्हणून निवड झाली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण करतानाच मनोजने घेतलेली ही ‘गरूड’भरारी कौतुकाचा विषय ठरली आहे.

मनोजचे वडील मंगेश जोशी हे माजी सैनिक असून, त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीत २२ वर्षे देशसेवा बजावली. वडिलांप्रमाणेच सैन्यात नोकरी करण्याची मनोजची सुरवातीपासून इच्छा होती. त्यासाठी शालेय जीवनापासून त्याने शरीर कमवायला सुरवात केली. दीड वर्षापूर्वी त्याची भारतीय स्थळसेनेत निवड झाली होती; परंतु तांत्रिक कारणाने त्याची ही संधी हुकली. तरीही नाउमेद न होता मनोजने तयारी सुरूच ठेवली. 

मागील वर्षी मे महिन्यात तासगाव (जि. सांगली) येथे झालेल्या भरती प्रक्रियेत त्याने पुन्हा नशीब आजमावले. त्यात सर्व शारीरिक व बौद्धिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊन चार दिवसांपूर्वी त्याला भारतीय वायुसेनेत ‘गरूड कमांडो’ म्हणून निवड झाल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.

२८ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण
भारतीय सैन्यात स्थळसेना, जलसेना व वायुसेना असे तीन विभाग आहेत. आपत्तीत बचाव कार्य व विशेष धाडसी मोहिमांसाठी गरूड कमांडोंची मदत घेतली जाते. दोन्ही दलांच्या तुलनेत वायुसेनेतील प्रशिक्षण जास्त कालावधीचे व खडतर असते. मनोज २२ जून रोजी प्रशिक्षणासाठी कर्नाटकमधील सांबरा (जि. बेळगाव) येथे रवाना होणार असून, हे प्रशिक्षण २८ महिने चालणार आहे.

नोकरी मिळेपर्यंत गोपालन!
मनोजने सैन्यात भरती होण्यासाठी एकीकडे प्रयत्न करतानाच दुसरीकडे दुग्ध व्यवसायही सुरू केला. विशेषतः देशी गाय पालनाला प्राधान्य दिले. या माध्यमातून स्वतःचा शैक्षणिक खर्च भागवून कुटुंबालाही हातभार लावला. देशी गायीचे दूध व जिममध्ये न जाता केलेला गावठी व्यायाम यामुळे चांगला फायदा झाल्याचे त्याने सांगितले.

आधी शिक्षकाची नोकरी, मग बनले तहसीलदार 
केज - जिद्द व चिकाटी असल्यास स्वप्नपूर्ती होतेच. अल्पशा यशात समाधान मानायचे नसते असेही काही अवलिया समाजात असतात. याचे उदाहरण म्हणजे सुधीर सोनवणे. शिक्षक असलेले सुधीर सोनवणे तहसीलदार पदापर्यंत पोचले आहेत. या प्रवासात त्यांनी वित्त अधिकारी आणि नायब तहसीलदारपदीही काम केले.

तालुक्‍यातील सारणी (आनंदगाव) येथील शेतकरी कुटुंबातील सुधीर नरसिंग सोनवणे गावातीलच पुरुषोत्तमदादा सोनवणे शाळेत शिकले. पदवीनंतर शिक्षणशास्त्र विषयातील पदवी हातात घेतलेल्या सुधाकर सोनवणे यांना तालुक्‍यातीलच तरनळी शाळेत शिक्षकाची नोकरीही मिळाली. नोकरी मिळाल्यास शक्‍यतो सर्वजण समाधानी असतात; मात्र स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याचा चंग मनाशी बांधून त्यांनी नोकरी आणि अभ्यास असा दुहेरी क्रम सुरू कला. त्यातही त्यांना यश आले आणि सुरवातीला त्यांची वित्त अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. मात्र, त्यावर समाधान न मानता त्यांनी अभ्यास करून पुन्हा नायब तहसीलदार पदापर्यंत मजल मारली; मात्र त्यांचे तहसीलदार होण्याचे स्वप्न होते. सांगोला येथे नायब तहसीलदार म्हणून काम करताना त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन तहसीलदारपद मिळविले. सुधीर सोनवणे यांचा प्रवास आणि यश स्पर्धा परीक्षेतून करिअर करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success in life rahul aware manoj joshi sudhir sonawane