लग्न जमविण्या आले अन्‌ लग्न लावुनिया परतले

सुषेन जाधव
रविवार, 7 मे 2017

उच्चशिक्षित तरुणाने केला हुंडा न घेता साधेपणाने विवाह
औरंगाबाद - विचारांनी मनं जुळतात असे म्हणतात. याचा प्रत्यय सहसा येताना दिसत नाही; मात्र असे असले तरी लाखांवर पगार असलेल्या त्या उच्चशिक्षित दोघांनी हुंडा न घेता साध्या पद्धतीने पाहण्याच्या कार्यक्रमातच लग्न करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

उच्चशिक्षित तरुणाने केला हुंडा न घेता साधेपणाने विवाह
औरंगाबाद - विचारांनी मनं जुळतात असे म्हणतात. याचा प्रत्यय सहसा येताना दिसत नाही; मात्र असे असले तरी लाखांवर पगार असलेल्या त्या उच्चशिक्षित दोघांनी हुंडा न घेता साध्या पद्धतीने पाहण्याच्या कार्यक्रमातच लग्न करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

तो अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर, तर ती मुंबईतील नामांकित कंपनीत नोकरीस. तो परदेशात कार्यरत असला तरी साधेपणा त्याच्यात तसाच होता. तीही मुंबईसारख्या शहरात नोकरीस होती; मात्र हुंड्याला विरोध तर होताच, शिवाय लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या ज्योतीला परिस्थितीची चांगलीच जाण होती. हुंडा पद्धती, मानपानाशिवाय साधेपणाने लग्न या विचारांचा अखेर मिलाफ झाला आणि केवळ मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातच त्यांनी शुभमंगल सावधान केले आणि "ज्योती'च्या साथीने खऱ्या अर्थाने "सार्थक' झाल्याचा प्रत्यय उपस्थित पाहुणे मंडळींना आला.

जिल्ह्यातील दरेगाव पाडळी (ता. खुलताबाद) येथील सार्थक गंगाधर गायकवाड हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर, तर गोळेगाव गदाना (ता. खुलताबाद) येथील ज्योती किसनराव औटे मुंबईत नोकरीला आहे. ज्योती चार महिन्यांची असतानाच वडिलांचे निधन झालेले. तेव्हापासून मामा अशोक काळे (वाकडी, ता. नेवासा) यांनी तिचा सांभाळ केला. ज्योतीने हुंडा न देता लग्न करण्याची प्रतिज्ञा केलेली. तिच्या मामांचीही हीच मनीषा होती. इकडे सार्थकचाही तोच विचार. अखेर शहरातील एका मंगल कार्यालयात शनिवारी (ता. सहा) मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत पडले अन्‌ साखरपुडा, लग्न अगदी साध्या पद्धतीने मानापानाशिवाय करून तरुणांसमोर या जोडीने एक नवा आदर्श ठेवला आहे.

भांडीकुंडी, मानपानाला फाटा
लग्नात कोणत्याही प्रकारचा मानपान नव्हता. शिवाय भांडीकुंडी, कपडेलत्ते आदी कशाचाच खर्च केला नाही. अर्थात खर्चाच्या सर्व प्रकारांना फाटा दिल्याचे ज्वलंत उदाहरण दोन्ही कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे.

मुलगा "एंगेजमेंट'साठी गावी आलेला होता. आम्हालाही अशी अनपेक्षित लग्नजुळणी होऊन विवाह पार पडेल असे वाटले नव्हते; परंतु मुलाच्या हुंडा न घेता लग्न करण्याच्या आणि मुलीच्याही हुंडा न देता लग्न करण्याच्या विचाराचा आज विजय झाल्याचा प्रत्यय येतो आहे.
- गंगाधर गायकवाड, वर-पिता

Web Title: success marriage in aurangabad