Success story : जिद्द, मेहनतीने भरले शेतकरीपुत्राच्या आयुष्यात रंग

अनिलकुमार जमधडे
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

रंग, शाई उद्योगात उत्तुंग भरारी, उत्पादनाला अमेरिकेतून आली मागणी 

औरंगाबाद - रंग आणि शाईमध्ये मिश्रण होणारे प्रॉडक्‍ट उत्पादित करून परदेशापर्यंत भरारी घेण्याचे काम पैठणच्या शेतकरीपुत्राने केले. 'नाथ टाईटनेस' या कंपनीच्या उत्पादनाला आता थेट अमेरिकेतील कंपन्यांनी मागणी सुरू केली आहे. कापूसवाडी (ता. पैठण) येथील राजेंद्र एकनाथ तांबे पाटील यांनी मेहनतीच्या जोरावर ही किमया साधली. 

श्री. तांबे यांनी रोज तीन किलोमीटर पायी प्रवास करीत ढोरकीनच्या जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीपर्यंत जायकवाडी (ता. पैठण) येथील शाहू विद्यालय, पदवीपर्यंत प्रतिष्ठान महाविद्यालय (पैठण) व त्यानंतर पुढे देवगिरी महाविद्यालयातून एम.एस्सी. (केमिस्ट्री) पूर्ण केले. दरम्यान, नाट्यशास्त्राच्या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेतला; मात्र "नाटकं करू नकोस, नाटकात काय पडलंय' असा सल्ला वजा समज वडिलांनी दिली. त्यामुळेच काही काळ संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात नोकरी पत्कारली; मात्र उद्योगाची इच्छाशक्ती स्वस्थ बसू देत नसल्याने महाराष्ट्र सोडला. गुजरातमध्ये जाऊन काही काळ नोकरी करतानाच संशोधनाचेही काम केले. त्यातूनच वर्ष 2014 मध्ये "नाथ टाईटनेस'ची स्थापना झाली. यासाठी पत्नी अनिता तांबे आणि संपूर्ण कुटुंबीयांची भक्कम साथ मिळाली. 

काय आहे उत्पादन? 
प्रिंटिंग युनिटमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध उत्पादनातील रंगांना बळकटी देण्याचे काम करणारे हे "स्क्रॅच रेजिस्टन्स' नावाचे उत्पादन आहे. वेफर्स, विविध खाद्यपदार्थांच्या वेष्टनावरील रंग निघू नये यासाठी हे उत्पादन काम करते. साधारण 450 डिग्रीपर्यंतचा रंग या उत्पानामुळे टिकून राहतो. आतापर्यंत महाराष्ट्रासह गुजरात, मुंबई, दिल्ली व अन्य ठिकाणी मागणी होतीच; मात्र आता थेट अमेरिकेच्या कंपनीतून मागणी आल्याचे तांबे यांनी सांगितले. विशेष म्हणजे पहिल्या ऑर्डरची पाठवणी करण्यात आली. 

मेहनत, जिद्द आणि विश्‍वास असेल तर उद्योगात भरारी घेणे अवघड नाही; मात्र त्यासाठी आपल्या उद्योगावर निष्ठा ठेवावी लागते. संपूर्ण कुटुंबाच्या साथीने हा उद्योगाचा प्रवास यशस्वी झाला. 
- राजेंद्र तांबे, उद्योजक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success story of a farmer's son