पर्यावरण समतोलासाठी  प्राणी, पक्षी संवर्धन गरजेचे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पैठण - आज माणूसच वनसृष्टी नष्ट करण्याचे काम करीत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक असणारे पक्षी व प्राणी जगविण्याची जबाबदारी महत्वाची आहे, असे प्रतिपादन वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

पैठण - आज माणूसच वनसृष्टी नष्ट करण्याचे काम करीत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक असणारे पक्षी व प्राणी जगविण्याची जबाबदारी महत्वाची आहे, असे प्रतिपादन वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

महसूल व वन, वन्यजीव विभाग आणि एनव्हायर्न्मेंटल रिसर्च फाउंडेशन ऍण्ड एज्युकेशनल ऍकॅडमी यांच्यातर्फे जायकवाडी पक्षी अभयारण्य आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते सोमवारी (ता. 26) बोलत होते. पैठण येथील मराठवाडा प्रशासकीय व प्रशिक्षण प्रबोधिनी येथे महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ पार पडला. पक्ष्यांच्या प्रतीकात्मक निवासस्थानाचे पूजन करून या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. यावेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी आमदार अनिल पटेल, भाऊ थोरात, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, मानद वन्यजीव रक्षक डॉ. दिलीप यार्दी, लक्ष्मण आवटे, लक्ष्मण सावजी, बसवराज मंगरुळे व वन व वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

प्रास्ताविकात डॉ. यार्दी यांनी जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या जलाशयात पाणवनस्पती वाढल्याने अभयारण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. यासाठी पाणी शुध्दीकरण शास्त्रोक्त पध्दतीने करावे लागणार असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले. 

वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, आगामी काळात कोणता देश धनसंपन्न आहे हे बघण्यापेक्षा कोणता देश वनसंपन्न आहे याचा विचार जागतिक पातळीवर केला जाईल. निसर्ग टिकविण्यासाठी शासनस्तरावर दोन कोटी वृक्षलागवडीचे काम करण्यात आले. यानंतर वन विभाग पुढाकार घेऊन 25 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचा संकल्प करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपावेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाणी आणि वन याबाबतची सुरक्षा ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. 

तत्पूर्वी, सोनेवाडी येथे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षी निरीक्षण केले. त्यानंतर मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीतील छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या ठिकाणी वृक्षरोपाचे पूजन व जल अर्पण करून श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षी महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमास वन विभागाचे उपवनसंवरक्षक अशोक गिऱ्हेपुजे, पक्षीमित्र अमेय देशपांडे, श्रावण परळीकर, रंजन देसाई, जय जोशी आदींची उपस्थिती होती. 

Web Title: sudhir mungantiwar environment