ऊसतोड मजुरांच्या संपाला हिंसक वळण, बीड जिल्ह्यात पेटविला टेम्पो

अनिरुद्ध धर्माधिकारी | Monday, 19 October 2020

राज्यभरात सुरू असलेल्या ऊसतोड मजुरांच्या संपाला सोमवारी (ता.१९) आष्टी तालुक्यात हिंसक वळण लागले. संपकऱ्यांनी पैठण-पंढरपूर पालखी महामार्गावर तालुक्यातील धिर्डी येथे एका टेम्पोला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला.

आष्टी (जि.बीड) : राज्यभरात सुरू असलेल्या ऊसतोड मजुरांच्या संपाला सोमवारी (ता.१९) आष्टी तालुक्यात हिंसक वळण लागले. संपकऱ्यांनी पैठण-पंढरपूर पालखी महामार्गावर तालुक्यातील धिर्डी येथे एका टेम्पोला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ऊसतोड मजूर व वाहतूकदारांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सध्या राज्यस्तरीय संप पुकारण्यात आलेला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप नेत्या पंकजा मुंडे करीत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी राज्यभर रान उठविले आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय कोयता हाती घेणार नाही, अशी भूमिका संपकऱ्यांच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यासाठी विविध मुकादम व वाहतूकदारांच्या संघटना एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

शरद पवार कृषी विधेयकावर बोलले; मालाच्या किंमतीची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध

दरम्यान, सध्या साखर कारखान्यांचे बॉयलर पेटल्याने गळीत हंगामासाठी विविध ठिकाणांहून ऊसतोड मजूर कारखान्यांकडे रवाना होत आहेत. काही दिवसांपूर्वी धुळे-जळगाव जिल्ह्यातील मजुरांची तीन वाहने आमदार धस समर्थकांनी आष्टी-कर्जत (जि. नगर) हद्दीवर अडवून आष्टीत आणली होती. येथे मजुरांचा पाहुणचार करून ‘संप मिटल्याशिवाय कारखान्यांवर जाऊ नका’, असे सांगत आमदार धस यांनी मजुरांना परत आपल्या गावी पाठविले होते.

सध्या आमदार धस यांचे याच संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे सुरू आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी संपकऱ्यांची भूमिका आहे. अशातच आष्टी-कर्जत हद्दीवरून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे मजुरांची वाहने रवाना होत आहेत. धिर्डी हे गाव आष्टी-कर्जत हद्दीलगत असून, याच भागातून मजुरांची वाहने जातात. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१८) रात्री तालुक्यातील धिर्डी येथे रस्त्यावरून चाललेला ऊसतोड मजूर घेऊन जाणारा आयशर टेम्पो (एमएच १६ क्यू ६७८८) संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी पैठण तालुक्यातील (जि. औरंगाबाद) सुमारे १५ ते २० मजूर व चालकाला खाली उतरवून पेटवून दिला, अशी माहिती समजली. त्यात टेम्पोचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला असून, हा टेम्पो नेमका कोणी पेटविला याबाबतची चौकशी करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होते. ऊसतोड मजुरांच्या संपाला हिंसक वळण लागल्याने खळबळ उडाली असून, या घटनेने संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपादन - गणेश पिटेकर