साखर कारखान्यांचे उशिरा पेटणार बॉयलर 

तुकाराम शिंदे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

तीर्थपुरी (ता.घनसावंगी)  : दुष्काळामुळे गाळपयोग्य ऊस उपलब्ध होण्यास लागणार अवधी 

तीर्थपुरी (जि. जालना) - अंबड आणि घनसावंगी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना तसेच सागर सहकारी साखर कारखान्यातर्फे वर्ष 2019-20 च्या गाळप हंगामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही कारखान्यांनी यंदाच्या हंगामात जवळपास सात लाख टन ऊस गाळपाचे नियोजन केलेले आहे. दुष्काळामुळे ऊसलागवडीवर गतवर्षी परिणाम झाला होता. त्यामुळे यंदा गाळपयोग्य ऊस उपलब्ध होण्यास अवधी लागणार आहे. परिणामी यंदा उशिराने बॉयलर पेटण्याची चिन्हे आहेत. वर्षाअखेरीस डिसेंबर महिन्यापर्यंत या कारखान्यांच्या गाळपाला प्रारंभ होणार आहे. 

गाळपासाठी नियोजन 
यंदाचा ऊस गाळपासाठी अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने 100 ट्रक, 80 ट्रॅक्‍टर, 800 टायर गाडी व 4 ऊसतोडणी यंत्र तसेच तीर्थपुरी येथील सागर सहकारी साखर कारखान्याने 20 ट्रक, शंभर ट्रॅक्‍टर, तीनशे टायर गाडी व दोन ऊसतोडणी यंत्र असे ऊस गाळपासाठी नियोजन केले आहे. 

कार्यक्षेत्रात सहा लाख टन ऊस 
समर्थ व सागर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सहा लाख टन ऊस उभा आहे. या दोन्ही कारखान्यांचे यंदाच्या गाळप हंगामात सात लाख टन उसाचे गाळप केले जाणार आहे. त्यामुळे उर्वरित एक लाख टन ऊस कार्यक्षेत्राबाहेरून आणला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

दुष्काळाचा सतत फटका 
समर्थ व सागर कारखान्याची गाळप क्षमता दहा ते बारा लाख टनांपर्यंत आहे. परंतु, दुष्काळाचा फटका या कारखान्यांना सतत बसत आहे. तरीही नियोजन करीत कार्यक्षेत्रात ऊसलागवडीसाठी कारखान्यातर्फे नियोजन तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन, मदत केली जात आहे. त्यामुळे दुष्काळातही नियोजन केल्याने यंदा कार्यक्षेत्रातून सहा लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. 

दुष्काळातही कारखान्यातर्फे गाळपाचे नियोजन केलेले होते. त्यामुळे कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध होऊ शकला. पुढील हंगामात कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळप केला जाणार आहे. दुष्काळी स्थितीमुळे ऊसउत्पादक अडचणीत आहेत. ही बाब लक्षात घेत पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांनी नवीन उसाची लागवड करावी, यासाठी कारखान्याने शिफारस केलेले बेणे तसेच खताची मात्रा उधारीवर देण्यात येत आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना आधार होईल. 
- राजेश टोपे, मार्गदर्शक, समर्थ कारखाना 

---
दुष्काळी परिस्थितीमुळे कार्यक्षेत्रातील उसाची पुरेशी न झालेली वाढ यामुळे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा गाळप हंगाम यंदा उशिराने सुरू होत आहे. समर्थ व सागर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. हे दोन्ही कारखाने सात लाख टनांपर्यंत ऊस गाळप करणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कारखान्याने गाळपाचे नियोजन केले आहे. 
- उत्तमराव पवार, उपाध्यक्ष, समर्थ साखर कारखाना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugar factories