'मारुतीच्या' रूपाने देशमुखांची औसा मतदारसंघात मजबूत तटबंदी, उटगेंना मिळणार नवसंजीवनी

जलील पठाण
Friday, 21 August 2020

मांजरा परिवारातील एखादा साखर कारखाना औसा तालुक्यात असावा म्हणून तत्कालीन अवजड उद्योगमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी बेलकुंड येथे संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याच्या निर्मितीने औसा तालुक्यातील शेतीचे आणि सहकाराचे चित्र बदलले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाला.

औसा (जि.लातूर) : मांजरा परिवारातील एखादा साखर कारखाना औसा तालुक्यात असावा म्हणून तत्कालीन अवजड उद्योगमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी बेलकुंड येथे संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याच्या निर्मितीने औसा तालुक्यातील शेतीचे आणि सहकाराचे चित्र बदलले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाला. मात्र पुढे निवडणुकीत संचालक मंडळ बदलले आणि खरी घरघर तेथूनच सुरू झाली.

वाचा : मांजरा धरणातील मृतसाठा भरला, लातूरचा एक वर्षाचा पाणी प्रश्न मिटला

विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने हा कारखाना उभारला असल्याने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दोन निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी त्यांना हा कारखाना ताब्यात घेण्यापासून दूर ठेवले. मात्र २०१९ मध्ये आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील भूमिपुत्र आणि दिलीपराव देशमुख यांचे मानसपुत्र समजले जाणारे श्रीशैल उटगे यांनी वेगळीच खेळी केली आणि भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवारांच्या पॅनलचा पराभव करून आगळी वेगळी भेट दिली. हा कारखाना सुरू करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र थकहमीसाठी अडचणी येत होत्या. या कारखान्याला शासनाने थकहमी दिल्याने लवकरच कारखाना सुरू होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा : लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

यामुळे देशमुख कंपनी या निमित्ताने औसा मतदारसंघात आपली मजबूत तटबंदी बांधत असून नेमकी टायमिंग साधत निष्ठवंत श्रीशैल उटगे यांना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढे आणण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. देशमुख आणि औसा हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. विलासराव देशमुख यांनी नेहमी औशाला मदत करतांना सढळ हाताने केली. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने देशमुखांची पकड थोडी ढिली झाली. दोनदा कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी नाकारल्याने दिलीपराव देशमुखांनीही गेल्या निवडणुकीत स्वतःला बाजूलाच ठेवले होते.

पराभवाचे मूळ आपल्या गोटात घेऊन एक हाती विजय संपादन करून अमित देशमुख यांनी त्यांच्यातला मुत्सद्दीपणा जिल्ह्याला दाखविला होता. या निवडणुकीतून जस भाजप आमदार अभिमन्यू पवारांचा प्रवेश तालुक्यात झाली. त्याच पद्धतीने देशमुख कंपनीने आपला मोहराही श्रीशैलच्या रूपाने पुढे आणला. कारखान्याला थकहमी देण्यासाठी शासनाला भाग पाडले. थोड्या दिवसांनी हा कारखाना सुरू होईल आणि पुन्हा देशमुखांची ढिली झालेली पकड पुन्हा मजबूत होऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची बीजे पेरली जातील असा अनेकांचा कयास आहे.

ते विधान सूचक
सोमवारी (ता.१७) पालकमंत्री अमित देशमुख यांनी औशात आढावा बैठक घेतली आणि या बैठकीत श्रीशैल उटगे यांनी औशाला दोनशे खाटाचे रुग्णालय द्यावे, अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी उटगे यांना 'दोनशे खाटच्या रुग्णालयाची मागणी करून तुम्ही औशाला येणार आहेत का?' असे विचारले. हे साधे विचारणे नव्हते तर आगामी काळात तुम्हाला औशाला यावे लागणार असल्याचे हे सूचक होते अशी चर्चा तालुकाभर सुरू आहे.
 

(संपादन : गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar Mill Change Politics Of Ausa Constituency Shrishail Utage