एक वर्ष काय, दहा वर्षे ऊस तोडू; पण मुलांना सीईओ, डॉक्‍टर, इंजिनिअर करू

एक वर्ष काय, दहा वर्षे ऊस तोडू; पण मुलांना सीईओ, डॉक्‍टर, इंजिनिअर करू

ऊसतोड कामगारांचा संकल्प - मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद
औरंगाबाद - आमच्या आजा-वडिलांच्या काळापासून आम्ही ऊसतोडीचे काम करतो; पण आमची मुले ऊसतोड कामगार होणार नाहीत. एक काय... दहा वर्षे ऊसतोडीचे काम करू, आमच्या मुलांना शिकवून सीईओ, डॉक्‍टर, इंजिनिअर करू, असा संकल्पच आम्ही केल्याची माहिती ऊसतोड कामगारांनी बुधवारी (ता. 15) मुख्यमंत्र्यांना दिली.

बुधवारी शाळेचा पहिला दिवस. शाळा उत्सव कार्यक्रमाअंतर्गत आपल्या कार्य व कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविलेल्या शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विभागीय आयुक्‍तालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी नंदुरबार, धुळे, पुणे, ठाणे, मराठवाड्यातील लातूर आणि औरंगाबाद या सहा जिल्ह्यांतील शाळांची निवड झाली होती. औरंगाबादपासून 23 किलोमीटरवरील पैठण तालुक्‍यातील निलजगावातील वरवंडी तांडा नंबर 2 केंद्र येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मधू राठोड (सहावी), वैशाली राठोड, कोमल राठोड (आठवी), सौरभ राठोड (चौथी), रामकिसन नजन (सातवी) यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, शिक्षणाधिकारी रहीम मोगल, मुख्याध्यापक रामचंद्र ब्रह्मनाथ, आत्माराम गोरे, सुभाष मानके, गजेंद्र बारी, भरत काळे, मनोहर नागरे, आसराजी सोंडगे उपस्थित होते.

अशी आहे निलजगावातील वरवंडी तांड्यावरील शाळा
1993 ला सुरू झालेल्या या शाळेत सध्या 171 विद्यार्थी आहेत. यापैकी 35 विद्यार्थी तांड्यावरील आहेत. या तांड्यावर 27 घरे असून, 231 लोकसंख्या आहे. तांड्यावरील 80 टक्के बंजारा समाज असून, ऊसतोडीला जातो. त्यामुळे मुलांच्या गळतीचे प्रमाण अधिक होते; मात्र तीन वर्षांत शिक्षकांनी पालकांची समजूत घालून, मुलांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत जनजागृती केली. शिक्षकांनी एक लाख रुपये खर्च करून शाळेला नवे रूप दिले, नागरिकांनी चार लाखांची मदत दिली.

शंभर टक्के सौजऊर्जेवर चालणारी, ऊसतोड कामगारांच्या मुलांचे स्थलांतर रोखणारी, ई-लर्निंगद्वारे अध्यापन, श्रमदानातून बांबूचे कुंपण करून घेतलेली, उत्तम असे ग्रंथालय असणारी, ज्ञानरचनावादी अशी ही शाळा आहे.

बारा वर्षांच्या मुली घर सांभाळून घेतात शिक्षण
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या या शाळेतील सुमारे सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या दहा मुलींची शिक्षणाची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आई-वडिलांसोबत ऊसतोडीला न जाता त्यांनी लहान वयात स्वत:च कुटुंबाची जबाबदारी उचलली आहे. स्वयंपाक करून, लहान भांवडांना सांभाळून शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. या कामात त्यांना घरातील आजी-आजोबांची मदत होत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले... तुम्हाला शाळा आवडते का बेटा...?
तुम्हाला शाळा आवडते का बेटा.., काय आवडते शाळेत, अभ्यासाव्यतिरिक्त कोणते विषय शिकता. शाळा स्वच्छ ठेवता का, पिण्याचे पाणी स्वच्छ आहे ना. पाणी वाया घालवत जाऊ नका. तुमच्यापैकी कुणाचे आई-वडील ऊसतोडीला गेले आहेत, या वेळेस तू गेली नाही त्यांच्यासोबत, तुला शाळेत राहू दिले, ये म्हटले नाही आमच्यासोबत. मला शिकायचे.. हे तूच सांगितले का, तुम्हाला शाळेत काय शिकायला मिळते. कोणता विषय आवडतो, असे प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी मुलांना विचारले.

तुमच्या मुलीला शाळेत ठेवावे असे का वाटले, त्यांना शिकवायचे आहे ना, मोठे करायचे आहे, इतरांनाही सांगा मुलांना शाळेत पाठवायला. शाळेच्या गुणवत्तेबाबत काय वाटते तुम्हाला, असे प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी पालकांना विचारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com