ऊसतोडीच्या हंगामाला झालीय सुरवात 

लक्ष्मीकांत कुलकर्णी
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटच्या गळीत हंगामास गुरुवारपासून (ता. 28) सुरवात झाली. दरम्यान, ऊसतोडीसाठी परिसरात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत.

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटच्या गळीत हंगामास गुरुवारपासून (ता. 28) सुरवात झाली. दरम्यान, ऊसतोडीसाठी परिसरात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. सर्वच गटांत ऊसतोडणीला सुरवात झाली आहे.

पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात मजुरांनी उसाची तोडणी सुरू केली मात्र पहिल्या दिवशी मजुरांचा संसार उघड्यावर होता. उसाचा हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांच्या टोळ्या परिसरात आल्या, काही टोळ्या येत आहेत. आलेल्या टोळ्या अगोदर कार्यालयापुढे थांबून कोणत्या गटात, शिवारात, गावात जायचे यासंदर्भात माहिती घेऊन रवाना झाल्या आहेत. काही टोळ्या आपापल्या ठिकाणावर दाखल झाल्या आहेत. 


काही मजुरांनी रात्री निवाऱ्यासाठी तयार केलेल्या झोपड्या. 

कोप्या बांधायला सुरवात 
मोठ्या शेतकऱ्यांच्या आखाड्यावर, गावाशेजारच्या मोकळ्या जागेत, माळरानावर, वीज, पाणी, जवळ गाव अशी ठिकाणे निवडून मजुरांनी आपापल्या कोप्या (घरे) बांधायला सुरवात केली आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून सरंक्षण व्हावे म्हणून वेळूच्या कोप्यांना तट्टे व तट्ट्यावरून प्लास्टिक ताडपत्री टाकून कोप्या बांधल्या जात आहेत. यामुळे शेतातील वस्त्या, माळरान पहिल्याच दिवशी माणसांनी गजबजून गेली आहेत. आखाडे, माळरान कोप्यांनी वस्तीसारखी वाटत आहेत. पहिल्याच दिवशी फडात मजुरांनी तोडीला सुरवात केली, दिवस आनंदात गेला तरी रात्र मात्र अनेक मजुरांना उघड्यावरच काढावी लागली. पहिल्या दिवशी संसारही उघड्यावरच मांडलेला होता. उघड्यावर स्वयंपाक, जेवण, धान्याची पोती, कपडेलत्ते पडलेले होते. तर काही मजुरांनी रात्री मुलाबाळांसाठी निवाऱ्यासाठी कोप्या बांधण्यास सुरवात केली होती. 

Image may contain: one or more people, outdoor and nature
ऊसतोडीला झालेली सुरवात.

परिसरात यंदा उसाचा तुटवडा 
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगाव विभागामध्ये कुंभार पिंपळगावसह राजाटाकळी, पिंपरखेड, जांबसमर्थ, देवी दहेगाव या पाच गटांत उसाचे क्षेत्र आहे. गेल्यावर्षी दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना ऊस मोडावे लागले, तर काहींनी चारा छावणीला दिला. काही शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उसाचे बेणे प्लॉट केले आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मोठ्याप्रमाणात उसाची लागवड सुरू झाली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे त्या शेतकऱ्यांनी कारखान्याऐवजी बेण्याला ऊस दिला आहे. गोदावरी परिसरातील राजाटाकळी, उक्कडगाव, शिवणगाव, गुंज, भादली, नागोबाची वाडी आदी गावांत मोठ्याप्रमाणावर ऊस आहे, तर पिंपरखेडमध्येही काही प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. 

हेही वाचा : सोयाबीन, उडिदाने पार केला भाव 

दुर्दशा झालेल्या रस्त्यांमुळे हाल 
परिसरातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांमुळे उसाच्या वाहतुकीबाबत हाल होत आहेत. गोदावरी नदीकाठच्या परिसरात ऊस असला तरी एकही रस्ता उसाने भरलेला ट्रक जाण्याइतका चांगला राहिला नसल्याने ऊसतोड मजुरांना मोठी अडचण येत आहे. त्यातच यावर्षीच्या जोरदार पावसाने पाणंद रस्ते, नदी, नाले, ओढ्यांना पाणी वाहत आहे. यामुळे ऊसतोडणीसाठी जाताना गैरसोय होत आहे. काही ठिकाणी उसात पाणी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugarcane cutting start