पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

लातूर - गेल्या अनेक वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून करून पतीनेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आर्वी (ता. लातूर) येथे मंगळवारी (ता. 11) सकाळी घडली. या प्रकरणी मृत पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली.

आर्वी (ता. लातूर) येथील हरिश्‍चंद्र अकनगिरे (वय 70) याची पत्नी कालिंदा (वय 65) यांना अनेक वर्षांपासून दुर्धर आजार होता. त्या घरात बेडवरच पडून होत्या. कुटुंबीयांकडून त्यांच्यावर नियमित औषधोपचार केले जात होते. औषधोपचार घेऊनही आजार बरा होईना म्हणून त्या त्रस्त झाल्या होत्या. त्याच्या वेदनाही त्यांना सहन होत नव्हत्या. त्यामुळे मला रुग्णालयात नेऊ नका, मला औषधोपचार देऊ नका, असे त्या आपल्या पतीला वारंवार म्हणायच्या. या सर्व प्रकाराला हरिश्‍चंद्र अकनगिरे वैतागलेला होता. काही दिवसांपासून तर कालिंदाबाई औषधेही घेत नव्हत्या. संतापाच्या भरात हरिश्‍चंद्र अकनगिरे याने सोमवारी (ता. 11) सकाळी आठच्या सुमारास पत्नी कालिंदाबाईचा गळा दाबून खून केला. त्यानंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी उठल्यानंतर हा प्रकार घरातील इतर लोकांच्या लक्षात आला. त्यानंतर नातेवाईकांना बोलावण्यात आले. याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यात कालिंदा अकनगिरे यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मृत हरिश्‍चंद्र अकनगिरे यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती श्री. बावकर यांनी दिली.

Web Title: suicide after murder