चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

औरंगाबाद - मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सोमवारी (ता. ८) घडल्या. नायगाव, सेलू, पैठण, गेवराई तालुक्‍यांतील या घटना आहेत.

नांदेड, औरंगाबाद - मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सोमवारी (ता. ८) घडल्या. नायगाव, सेलू, पैठण, गेवराई तालुक्‍यांतील या घटना आहेत.

वीज तारेला केला स्पर्श
नांदेड - प्रवाही वीज तारेला स्पर्श करून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना लालवंडी (ता. नायगाव) येथे आज सकाळी घडली. शिवहार एकनाथ बोमनाळे (वय २७) असे त्यांचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे त्यांनी बॅंक, खासगी सावकाराकडून प्रपंच चालविण्यासाठी कर्ज काढले होते. त्याची वेळेवर परतफेड होऊ शकत नसल्याने ते नैराश्‍यात होते. त्यातून त्यांनी शेतातील कृषी पंपाला वीजपुरवठा करणाऱ्या तारेला स्पर्श केल्याचे सांगण्यात आले. 

सेलू तालुक्‍यामध्ये आत्महत्या
चारठाणा - सावंगी पी. सी. (ता. सेलू) येथील शेतकरी सुदाम किसनराव ताठे (वय ४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. त्यांच्यावर बॅंकेचे चार लाखांचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कर्जफेड, मुलीचे लग्न कसे करावे या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. 

पैठण तालुक्यात विष घेतले
पाचोड - लिंबगाव (ता. पैठण) येथील तरुण शेतकऱ्याने शेतात विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. नवनाथ सूर्यभान पाचे (वय २६) असे शेतकऱ्याचे नाव आहे.  शेतीसह मोलमजुरीवर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. दुष्काळामुळे पाच-सहा वर्षांपासून मोसंबीची बाग जळाली. यंदा कपाशीसाठी झालेला खर्चही वसूल झाला नाही. नवनाथने बॅंक, सोसायटीचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी नवनाथ पत्नीसह ऊसतोडणीसाठी गेला होता. हंगाम लवकर आटोपल्याने घेतलेली उचलही न फिटल्याने तो नैराश्‍यात होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जफेड कशी करावी, या चिंतेतून नवनाथने काल शेतात विष घेतले.

गेवराई तालुक्‍यात आत्महत्या
गेवराई - तालुक्‍यातील तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्‍यातील पाचेगाव येथे घडली. अंगद तुकाराम बनसोडे (३०) असे मृताचे नाव आहे. तुकारामने शनिवारी (ता. सहा) विष प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. खासगी सावकारी व बॅंकेच्या कर्जामुळे आत्महत्या केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

Web Title: Suicide of Four Farmers in marathwada