आरक्षण नाही, कर्जाचाही भार न पेलवल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या 

जगदीशचंद्र जोशी
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

देवळाली येथील तृष्णा तानाजी माने (वय 19) ही उस्मानाबाद येथील व्ही. जे. शिंदे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. 29 जुलै ला तिने विषारी औषध प्राशन केले.

शिराढोण : गुणवत्ता असूनही नोकरीची संधी नाही, सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, वडिलावर असलेले कर्ज, यातून आलेल्या नैराश्यामुळे विषारी औषध प्राशन केलेल्या देवळाली (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील 19 वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी (ता. 1) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

देवळाली येथील तृष्णा तानाजी माने (वय 19) ही उस्मानाबाद येथील व्ही. जे. शिंदे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. 29 जुलै ला तिने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी उस्मानाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, बुधवारी (ता. 1) रात्री 8 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून तिचा मृतदेह देवळाली येथे आणण्यात आला. 

दरम्यान, गुरुवारी (ता. 2) ग्रामस्थ व नातेवाईकांनी कळंबचे तहसीलदार अशोक नांदगावकर यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, तृष्णाचे वडील शेतकरी आहेत. सततची नापिकी, वडिलांवर कर्ज असल्याने शैक्षणिक खर्चाचा असलेला ताण, त्यामुळे वडिलांना लग्नाचा खर्च पेलावणार नाही, गुणवत्ता असूनही नोकरीची संधी नाही, सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, शेतातील पिकाला हमीभाव नसल्यामुळे यातून आलेल्या नैराश्यामुळे तृष्णाने 29 जुलै ला विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार नांदगावकर, नायब तहसीलदार अस्लम जमादार, शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख, मंडळ अधिकारी अनिल अहिरे, तलाठी पी. एस. पारखे, पोलिसपाटील संदीप पाटील हे देवळाली येथे दाखल झाले. 
दरम्यान, मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी 26 ऑगस्ट 2016 ला काढलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चात तृष्णाने सहभाग घेतलेला होता. 

नोकरीमध्ये मराठा समाजाला नसलेल्या आरक्षणामुळे तृष्णा माने हिने आत्महत्या केल्याचे निवेदन तिच्या नातेवाईकांनी दिले आहे.
- अनिल अहिरे, मंडळ अधिकारी

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Suicide of a girl student at Shiradhon because of depression of loan